चार तासांचे प्रयत्न, 15 मिनिटे लाईट बंद अन्‌ पक्ष्याची झेप! 

परशुराम कोकणे
गुरुवार, 24 जानेवारी 2019

सोलापूर : पक्षीमित्रांनी चार तास प्रयत्न केल्यानंतर 15 मिनिटांसाठी वीजपुरवठा खंडित झाला. धाडसाने विजेच्या खांबावर मांजात अडकलेल्या सातभाई पक्ष्याचे प्राण वाचविण्यात यश आले. हा प्रकार मंगळवारी (ता. 22) रात्री पावणेअकराच्या सुमारास जुळे सोलापूर परिसरातील एसआरपीएफ कॅम्पच्या मागील प्रल्हादनगर येथे घडला. 

सोलापूर : पक्षीमित्रांनी चार तास प्रयत्न केल्यानंतर 15 मिनिटांसाठी वीजपुरवठा खंडित झाला. धाडसाने विजेच्या खांबावर मांजात अडकलेल्या सातभाई पक्ष्याचे प्राण वाचविण्यात यश आले. हा प्रकार मंगळवारी (ता. 22) रात्री पावणेअकराच्या सुमारास जुळे सोलापूर परिसरातील एसआरपीएफ कॅम्पच्या मागील प्रल्हादनगर येथे घडला. 

वन्यजीवप्रेमी शुभम भोसले यांना प्रल्हादनगर परिसरातील एका नागरिकाचा फोन आला. एक पक्षी विजेच्या तारेवर पतंगाच्या मांजामध्ये अडकल्याचे कळविले. घटनेची माहिती समजताच वन्यजीवप्रेमी संस्थेचे प्रमुख मुकुंद शेटे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोचले. डीपीला जोडणाऱ्या मुख्य तारेला अडकलेल्या मांजामध्ये पक्षी फसला होता. महावितरण विभागाच्या कार्यालयात संपर्क साधला. सुरवातीला अपेक्षित मदत मिळाली नाही. हा भाग आमच्याकडे येत नाही, तुम्ही त्यांना फोन करा... आमचा संबंध नाही असे सांगून टाळाटाळ केली. यात जवळपास दीड तास गेला. त्यानंतर श्री. शेटे यांनी इको फ्रेंडली क्‍लबचे सदस्य आणि महापारेषणचे उपकार्यकारी अभियंता अमेय केत यांना मदतीच्या अपेक्षेने संपर्क केला. श्री. केत यांनी महावितरणचे सहायक अभियंता महेश कटारे यांच्याशी संपर्क साधून वीजपुरवठा खंडित करण्यासाठी कर्मचाऱ्यांशी जोडून दिले. 

महापालिकेचे अभियंता परदेशी यांनी तत्काळ तारेपर्यंत पोचण्यासाठी बास्केट गाडी पाठवली. बास्केट वाहन चालक भीमा माने उत्साहाने मदतीला धावून आले. महावितरणचे मंगलेकर घटनास्थळी दाखल झाले. वन्यजीवप्रेमी संस्थेचे सदस्य शुभम भोसले, प्रवीण जेऊरे, विशाल माढेकर, अभिलाष गिरबोने, रोहित कट्टामय्या, वीरेश एरटे हेही घटनास्थळी पोचले. वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतर खांबावर अडकलेल्या सातभाई पक्ष्याच्या बचाव कार्याला वेग आला. सायंकाळी सात वाजता सुरू केलेले बचावकार्य रात्री 11 वाजता संपले. मांजात अडकलेल्या सातभाई पक्ष्याला सुखरूप वाचविण्यात यश मिळाले. 

पतंग उडविण्यासाठी काचेरी आणि नायलॉन मांजा सर्रास वापरला जात आहे. पतंग कटल्यानंतर मांजा झाडांवर, विजेच्या खांबावर अडकून राहतो. त्यामुळे पक्ष्यांसह माणसांचा जीव धोक्‍यात आला आहे. पतंगासाठी साधा धागा वापरावा. मांजा वापरताना कोणी दिसले तर त्याचे प्रबोधन करावे. 
- मुकुंद शेटे, प्रमुख, वन्यजीवप्रेमी संस्था

Web Title: electricity cut for save life of bird