मराठवाडीच्या काठावरील धोका हटला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जुलै 2019

विजेच्या धोकादायक खांबांमुळे गावावर ओढवलेले मोठे संकट वीज कंपनीच्या तत्परतेमुळे हटले आहे. दै. सकाळने बातमीद्वारे वस्तुस्थिती समोर आणल्यामुळेच तातडीने हे घडू शकले.
- जितेंद्र पाटील, मुख्य समनव्यक मराठवाडी धरण (जनजागर प्रतिष्ठान)

ढेबेवाडी - संततधार पावसामुळे खचलेल्या जमिनीबरोबर डोंगरातून घसरत खाली आलेला आणि कोणत्याही क्षणी रस्त्यावर कोसळून मोठ्या दुर्घटनेची भीती असलेला उच्चदाब वीज वाहिन्याचा खांब वीज कंपनीने तातडीने हालचाली करून सुरक्षित ठिकाणी हलविल्याने मराठवाडी धरणग्रस्तांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. या गंभीरप्रश्नी ‘सकाळ’ने बातमीद्वारे आवाज उठविल्यानंतर जाग आलेल्या संबंधित यंत्रणेने तत्काळ ही कार्यवाही केल्याने धरणग्रस्तांसह वाहनचालक, प्रवासी आणि पादचाऱ्यांनी ‘सकाळ’ला धन्यवाद दिले आहेत.

मराठवाडी धरणंतर्गत मेंढ गावाकडे जाणारा धरणाच्या भिंतीवरील हंगामी मार्ग संततधार पावसामुळे बंद झाला असून, काही वर्षांपूर्वी जाधववाडीमार्गे तयार केलेल्या पर्यायी रस्त्यावरून तेथील विद्यार्थी व नागरिकांची ये- जा सुरू आहे. मात्र, तो रस्ताही कच्चा असल्याने दलदलीमुळे अक्षरशः कसरत सुरू आहे. याच रस्त्यालगत डोंगर उताराला उभारलेला विजेचा लोखंडी खांब आजूबाजूची जमीन खचल्याने प्रवाहित वीजवाहिन्या आणि त्याला दिलेल्या तानासह घसरत खाली आला होता. कोणत्याही क्षणी ताण उपसून खांब रस्त्यात कोसळण्याची भीती असल्याने तेथून ये- जा करणाऱ्यासह धरणग्रस्तांत घबराटीचे वातावरण होते. दुसरा पर्यायी रस्ता नसल्याने शालेय विद्यार्थी, गुराखी व नागरिकांची जीव मुठीत धरून सुरू असलेली ये- जा ‘सकाळ’ने बातमीद्वारे समोर आणल्यानंतर वीज कंपनीने तातडीने पाऊले उचलून खबरदारीचा उपाय म्हणून खांबावरील वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद करून नवीन धोकादायक खांब दुसरीकडे सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम हाती घेतले. भर पावसात अनेक अडचणींना तोंड देत सुरू असलेल्या या कामामुळे तीन दिवस त्या परिसरातील वीजपुरवठा बंद होता. एका बाजूला वेगाने वाढणारे धरणाचे पाणी आणि दुसरीकडे घनदाट जंगलाचा परिसर यामुळे या काळात अंधारात नागरिकांना अनेक अडचणीशी सामना करावा लागला असला, तरी गावच्या मार्गावर विजेच्या धोकादायक खांबाच्या रूपाने उभे असलेले मोठे संकट हटल्याने त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electricity Poll Danger