फलटणला पावसामुळे रात्रभर वीज गायब

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

सांगवी - फलटण शहरासह ग्रामीण भागामध्ये झालेल्या पहिल्याच वादळी वाऱ्यात ‘महावितरण’ची निकृष्ट कामे चव्हाट्यावर आली आहेत. गुरुवारी (ता. १७) सायंकाळी जोरात वारे आले आणि रात्री शहरासह ग्रामीण भागातून वीज गायब झाल्यामुळे नागरिकांची रात्रभर गैरसोय झाली.

सांगवी - फलटण शहरासह ग्रामीण भागामध्ये झालेल्या पहिल्याच वादळी वाऱ्यात ‘महावितरण’ची निकृष्ट कामे चव्हाट्यावर आली आहेत. गुरुवारी (ता. १७) सायंकाळी जोरात वारे आले आणि रात्री शहरासह ग्रामीण भागातून वीज गायब झाल्यामुळे नागरिकांची रात्रभर गैरसोय झाली.

फलटण शहर आणि ग्रामीण भागात ‘महावितरण’च्या सर्वच ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाची कामे झाली असल्याने काही ठिकाणी खांब वाकले आहेत, तर काही ठिकाणी मोडून पडले आहेत. काही ठिकाणी तारा तुटल्या आहेत. त्यामुळे लोक वैतागून गेले. अगोदरच तालुक्‍यातील लोकांची ‘पाणी आहे तर वीज नाही’ अशी अवस्था आहे. तालुक्‍यातील ५८ ठिकाणी जळलेले ट्रान्स्फॉर्मर अद्याप बसवले नाहीत तर अडीच हजाराहून अधिक ठिकाणी अजून शेतकऱ्यांना वीज जोडून मिळाली नाही. त्यामुळे विजेवाचून अनेक ठिकाणी पिके जळून जाऊ लागली आहेत. निंबळक (वाजेगाव) येथील राजमाने दांपत्याने ‘महावितरण’ला शंभरहून अधिक वेळा सांगितले, तरी ‘महावितरण’ने शेतातून जाणारी वाहिनी बदलली नाही. त्यात तरुण शेतकरी दांपत्याला आपला जीव गमवावा लागला. त्यांची दोन लहान मुले पोरकी झाली. राजाळे येतील तरुण शेतकरीसुद्धा विजेचा धक्का बसल्याने जागेवरच मृत्युमुखी पडला. शेतकऱ्यांची २०१६- २०१७ मध्ये हातातोंडाला आलेली ३० हेक्‍टर, तर २०१७- २०१८ मध्ये ५० ते ५५ हेक्‍टरहून अधिक पिके शॉर्टसर्किटीने डोळ्यासमोर जळून खाक झाली. मात्र, अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना त्याचे काही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे. फलटण तालुक्‍यातील ‘महावितरण’चा कारभार सुधारण्यासाठी अगोदर ठेकेदारांची चौकशी होऊन ते नेमके कोणत्या अधिकाऱ्यांबरोबर हात मिळवणी करतात व त्या निकृष्ट कामाला प्रोत्साहन देतात त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

फलटण तालुक्‍यात ‘महावितरण’चा कारभार अतिशय चुकीच्या पद्धतीने सुरू असून, सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. ‘महावितरण’ने आपल्या कामात लवकरात लवकर सुधारणा न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना ‘महावितरण’च्या विरोधात आंदोलन छेडणार आहे.
- धनंजय महामुलकर, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

Web Title: electricity rain faltan