वीज बचतीतून पाऊण कोटीची बचत!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जून 2019

सेव्ह एनर्जी, सेव्ह मनी या उपक्रमांतर्गत ‘महावितरण’कडून वीज बिले कमी करून घेण्यात यश आले आहे. फॉल्टी मीटर्सप्रकरणी पाठपुरावा केल्यामुळे त्यातही नगरपालिकेचा फायदा झालेला आहे. पालिकेच्या मिळकतींवर सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा मानस आहे.
- विजय वाटेगावकर, नियोजन सभापती, कऱ्हाड

कऱ्हाड - स्वच्छतेत पहिल्या आलेल्या पालिकेने आता ‘वीज बचती’चा उपक्रम हाती घेतला आहे. शासनाच्या ऊर्जा विकास संवर्धन धोरणांतर्गत शहरातील केलेल्या बदलांमुळे पालिकेला वर्षाला सुमारे पाऊण कोटींची बचत करण्यात यश मिळाले आहे. त्यामध्ये पालिकेच्या सर्व मालमत्तांमधील फॉल्टी मीटर्स बदलले, पथदिवे बदलून तेथे एलईडी दिवे बसवले आहेत. तसेच पथदिव्यांच्या देखभाल, दुरुस्तीमुळे वीज वापरात घट होऊन पालिकेचा पाऊण कोटींचा नफा शिल्लक दिसतो आहे. 

वीज बचतीसाठी नियोजन सभापती विजय वाटेगावकर व पालिकेच्या विद्युत निरीक्षक सौ. धन्वंतरी साळुंखे यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे वीज बचतीतून पालिकेस पाऊण कोटींचा नफा मिळवून देणारी कऱ्हाड पालिका जिल्ह्यातील एकमेव पालिका ठरली आहे. 

शहरीकरण व औद्योगिकीकरणाचा वाढता विकासदर लक्षात घेऊन केंद्र शासनाने ऊर्जा बचतीसाठी ऊर्जा संवर्धन कायदा २००१ मध्ये केला. त्या कायद्यांतर्गत राज्य शासनाने ऊर्जा संवर्धन धोरण विहित केले आहे.

धोरणानुसार पालिकांना एलईडी पथदिवे बसविणे बंधनकारक केले. धोरण नगरविकास विभागाने स्वीकारलेही. त्यानुसार केंद्राच्या सार्वजनिक उपक्रम असलेल्या एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेसच्या (ईईएसएल) माध्यमातून एस्को एलईडी पथदिवे बसविण्यासाठी करार केला. त्यानुसार कऱ्हाड पालिकेने पथदिव्यासाठी फक्त एलईडी दिवे बसविणे कामी ईईएसएलसोबत करारनामा केला होता. पालिका हद्दीतील जुने स्ट्रीट लाइट फिक्‍चर्स, जुने टी-५, सोडियम लॅम्प, मोठे मेटल लॅम्प, हायमास्ट असे एकूण २६२८ पथदिवे बदलून तेथे नवीन एलईडी बसवले आहेत. नागरिकांच्या मागणीनुसार एक हजार २१२ एलईडी नवीन ठिकाणी बसवण्यात आले. शहरात एकूण तीन हजार ८४० एलईडी लावण्यात आले आहेत. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, गटनेते राजेंद्रसिंह यादव, मुख्याधिकारी यशवंत डांगे आदींनी समन्वयाने काम केल्याने पालिका आज पाऊण कोटींच्या बचतीत आहे. 

पूर्वीच्या पथदिव्यांमुळे पालिकेस प्रति महिना सात लाख २५ हजार ते सात लाख ५० हजारांचे बिल येत होते. नवीन एलईडी बसविल्यानंतर वीज वापरात कमालीची घट झाली. पालिकेस प्रति महिना तीन ते साडेतीन लाखांचे वीज बिल येत आहे. त्यात सुमारे साडेचार लाख रुपयांची बचत होत आहे. याबरोबरच ईईएसएलतर्फे लावलेल्या एलईडी स्ट्रीट लाइटसचे सात वर्षे देखभाल व दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. पालिकेस त्यासाठी दरवर्षी १७ लाख ५० हजार रुपयांचे टेंडर काढावे लागत होते. त्याची बचत झाली आहे.

शहरातल्या स्ट्रीट लाइट्‌स एकावेळी चालू व बंद करण्याकामी सीसीएमएस नवीन यंत्रण बसविण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील सर्व स्ट्रीट लाइट्‌स एका वेळी चालू व बंद होणार आहे. त्याचेही पालिकेला वार्षिक सहा लाख रुपयांचे टेंडर काढावे लागत होते. त्यातही बचत होणार आहे. त्यामुळे सर्व मिळून ७५ लाख रुपयांचा खर्च वर्षाला वाचणार आहे. त्यासाठी विद्युत निरीक्षक धन्वंतरी साळुंखे यांनी अथक पाठपुरावा केला आहे. पालिकेच्या मालकीचे १५६ मीटर्स असून, यातील काही मीटर्स बिलांची पडताळणी केली असता सरासरी बिल देण्यात येत होते. ही बिले ‘महावितरण’ला पाठवून बिले कमी करण्यासाठी त्या पाठपुरावा करत होत्या. ‘महावितरण’कडून २८ फॉल्टी मीटर्स बदलण्यात आले. त्यात एका मीटरचे बिल हजारो रुपये पालिकेला देण्यात येत होते. मीटर्स बदलल्यानंतर वीज बिल कमी झाले आहे. सरासरी बिलांवरही पालिकेने टाच आणली आहे. परिणामी वीज बिलांवरील खर्च कमी झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electricity Saving Money Saving