वीजचोरट्यांना चार कोटींचा दंड

Electricity
Electricity

सांगली - ‘महावितरण’तर्फे राबविण्यात येणाऱ्या ’वीजचोरी कळवा बक्षीस मिळवा’ या योजनेत वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना मागील तीन वर्षांत सुमारे ४१ लाख रुपये रोख रक्कम म्हणून बक्षीस स्वरूपात देण्यात आले आहेत. वीजचोरीला आळा बसावा यासाठी महावितरणतर्फे वीजचोरीविरुध्द सातत्याने मोठ्या प्रमाणात मोहिमा राबविण्यात येत असतात. तरीही काही वीजग्राहक नवनवीन युक्‍त्या वापरून विजेची चोरी करीत असतात. अशा वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना वीजचोरीच्या अनुमानित रकमेच्या दहा टक्के रक्कम रोख स्वरूपात बक्षीस म्हणून देण्यात येते.  वीजचोरी करणाऱ्या ग्राहकाने तडजोड रकमेसह वीजचोरीची संपूर्ण रक्कम भरल्यानंतरच बक्षीस देण्यात येत असून, माहिती देणाऱ्याचे नावही गुप्त ठेवण्यात येत असते.

सन २०१५-१६, २०१६-१७ व २०१७-१८ या आर्थिक वर्षात अशा स्त्रोतांद्वारे वीजचोरीच्या ३६ ठिकाणांची माहिती मिळाली.  या ठिकाणी महावितरणच्या भरारी पथकाने टाकलेल्या धाडीत सुमारे ४.१० कोटी रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. ही संपूर्ण रक्कम वीजचोर ग्राहकांकडून वसूल करण्यात आली आहे. योजनेनुसार या वीजचोरीची दहा टक्के रक्कम माहिती देणाऱ्याला रोख बक्षीसे देण्यात आली आहे.

या संदर्भात व्हिडीओ कॉन्फर्सिंगमध्ये महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी ज्या भागात जास्त वीजचोऱ्या आहेत, त्या भागात भरारी पथकाने सातत्याने भेटी द्याव्यात आणि स्थानिक जनतेच्या सहकार्याने वीजचोरांविरूध्द कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत. महावितरणने वीजचोरी पकडण्यासाठी सर्व मंडलस्तरांवर भरारी पथकांची स्थापना केली आहे. या भरारी पथकाद्वारे वीजचोरीविरुध्द सातत्याने मोहिमा राबविण्यात येत असतात.

सांगलीत चोरीबाबत जत तालुका आघाडीवर
सांगली जिल्ह्यात वीजचोरीबाबत जत तालुका आघाडीवर आहे. खांबावर आकडे टाकून चोरीचे प्रकार तेथे सर्रास आहेत. त्यानंतर मिरज पूर्वभाग, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर तालुक्‍यांतही असे प्रकार आहेत. जिल्ह्यात सर्वात कमी गळती आणि चोरी सांगली शहर विभागात आहे. विशेष म्हणजे राज्य शासनाने वीज चोरी रोखण्यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत. प्रत्येक दोन कृषी पुरवठ्यासाठी नव्याने यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रियाही सुरु करण्यात आली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रासाठी यासाठी अनुदान कमी तर विदर्भ मराठवाड्यासाठी जादा अनुदान दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com