दिवसाढवळ्या आकडा टाकून होतेय वीजेची चोरी

दिवसाढवळ्या आकडा टाकून होतेय वीजेची चोरी

झरे - बेरगळवाडी (ता. आटपाडी) येथील ठोंबरेवस्ती येथे १०० केव्हीचा ट्रान्सफार्म असून त्याच्यावर १९० एचपीचा लोड आहे, त्यावर आकडाटाकून दिवसांढवळ्या राजरोसपणे वीजेची चोरी सुरू आहे. या घटनांमुळे ट्रान्सफार्मवर दाब येत आहे. याचा परिणाम काही भागात मोटारींना कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. यामुळे मोटारी जळणे, मोटार सुरू न होणे असे प्रकार घडत आहेत. रीतसर वीज जोडणी असून सुद्धा अशा प्रकारामुळे पिकाला पाणी देण्यात अडचणी येत आहेत.

याबाबत पडळकरवाडीचे माजी सरपंच विठ्ठल पडळकर व ग्रामस्थांनी कनिष्ठ अभियंता विष्णू मंडले याचेकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. तरी देखील याची दखल घेतली जात नाही.

ज्या शेतकऱ्यांनी आकडे टाकून वीज चोरी केली आहे. त्याची छायाचित्रेही अधिकाऱ्याकडे दिली आहेत, तरीही कारवाई करण्यात येत नाही. उपअभियंता व्ही. एस. गुरव (आटपाडी) याचेकडे अनेक वेळा तक्रारी दिल्या आहेत. प्रत्यक्ष वीज चोरी होतेय तेथील व्हिडीओ शुटीग व छायाचित्रे अधिकाऱ्यांना व्हाॅट्असद्वारे पाठविले आहेत, तरी देखील कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांत नाराजी व्यक्त होत आहे.

या परिसरात टेंभूचे पाणी आल्याने सर्वच ठिकाणी बागायती शेती केली जात आहे. पण सध्या बऱ्याच ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत नाही याचा फटका पिकांना बसत आहे. पिके वाळू लागली आहेत. पाणी नाही म्हणून दुष्काळ आणि आता पाणी असून वीज नसल्याने दुष्काळ अशी अवस्था झाली आहे.  तरी जादा दाब असल्याने छोटा ट्रान्सफार्म बदलून मोठा ट्रान्सफार्म बसवावा किवां नवीन ट्रान्सफार्म बसवावा अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.

वीज चोरीची छायाचित्रे, व्हिडिओ व तोंडी तक्रारी वारंवार करून देखील महावितरण कोणतीही कारवाई करीत नाही.

- विठ्ठल पडळकर माजी सरपंच 

माझ्याकडे अशा आशयाच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. वीज चोरी थांबविण्याच्या सुचना संबंधीत कर्मचाऱ्यांना दिल्या असून याची चाैकशी केली जात आहे.

- विष्णू मंडले, कनिष्ठ अभियंता

वीज चोरीच्या तक्रारी आल्या आहेत. कर्मचारी पाहाणी करीत आहेत. तसेच शेतकऱ्यांनी नवीन वीज जोडणीची मागणी केल्यास  त्यांना जोडणी मंजुरी देऊ

- व्ही. एस. गुरव, उपअभियंता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com