पूरबाधित क्षेत्रात वीज, पाणीपुरवठा सुरूच राहणार; महाजन यांचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

पूरबाधित क्षेत्रात विद्युत यंत्रणा, पाणीपुरवठा योजना तत्काळ सुरू करा. रोगराई पसरू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा. लोकांचे जीवन सुरळीत करण्यासाठी आवश्यक सर्व निधी, मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल. लोकांच्या गरजा लक्षात घेवून यंत्रणांनी आराखडे तयार करावेत व तत्काळ सादर करावेत, असे निर्देश जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी आज दिले आहेत.

मुंबई : पूरबाधित क्षेत्रात विद्युत यंत्रणा, पाणीपुरवठा योजना तत्काळ सुरू करा. रोगराई पसरू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा. लोकांचे जीवन सुरळीत करण्यासाठी आवश्यक सर्व निधी, मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल. लोकांच्या गरजा लक्षात घेवून यंत्रणांनी आराखडे तयार करावेत व तत्काळ सादर करावेत, असे निर्देश जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी आज दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात पूरपरिस्थितीबाबत सर्व यंत्रणांचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, माजी राज्यमंत्री सुरेश धस, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता एच. व्ही. गुणाले, विशेष कार्य अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्यासह सर्व यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

महाजन यांनी सांगितले की, पूर ओसरल्यानंतर येणाऱ्या संभाव्य रोगराईला अटकाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना तत्काळ गतीमान करा. पूरबाधित क्षेत्रातील लोकांच्या रक्त चाचण्या घ्या, स्वच्छतेसाठी यंत्रणा राबवा, औषध फवारणी करण्यासोबतच स्वच्छ व शुद्ध पाणी पिण्यास मिळेल याची सर्वतोपरी दक्षता घेण्याचे सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electricity, water supply in flood-hit areas will continue