वीजबिलांचे होणार केंद्रीकरण; महावितरणचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

देशातील वीज वितरण क्षेत्रात अशा पद्धतीचा नावीन्यपूर्ण प्रयोग प्रथमच होत आहे. यामुळे ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सेवांच्या गुणवत्तेत वाढ होणार आहे. महावितरणच्या सध्याच्या बिलिंग व्यवस्थेतील प्रक्रियेमुळे वीजबिलांची छपाईपासून ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी साधारणतः सात ते आठ दिवसांचा कालावधी लागतो.

सोलापूर : राज्यातील अडीच कोटीपेक्षा अधिक वीज ग्राहकांना वेळेत व अचूक वीजबिल मिळावे. ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी अधिक कालावधी मिळावा. याकरिता वीजबिलांची छपाई व वितरण केंद्रीय स्तरावर करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. त्याच्या प्रक्रियेस सुरवातही झाली आहे. 

देशातील वीज वितरण क्षेत्रात अशा पद्धतीचा नावीन्यपूर्ण प्रयोग प्रथमच होत आहे. यामुळे ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सेवांच्या गुणवत्तेत वाढ होणार आहे. महावितरणच्या सध्याच्या बिलिंग व्यवस्थेतील प्रक्रियेमुळे वीजबिलांची छपाईपासून ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी साधारणतः सात ते आठ दिवसांचा कालावधी लागतो. ग्राहकांना वेळेत वीजबिल न मिळाल्यामुळे त्वरित बिल भरण्याकरिता महावितरणकडून देण्यात येणारी सूट (प्रॉम्टपेमेंट डिस्काऊंट) ग्राहकांना मिळत नाही. याशिवाय वेगवेगळ्या एजन्सींद्वारे वीजबिलांची छपाई व वितरण होत असल्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे अवघड जाते. 

या सर्व बाबींवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी महावितरणच्यावतीने केंद्रीय पद्धतीने वीजबिलाची छपाई व वितरण करण्यात येणार आहे. मोबाईल मीटर रीडिंग अॅपमुळे प्रत्यक्षवेळी (रिअल टाइम) मीटर वाचन तसेच चेक रीडिंग उपलब्ध होत आहे. त्यामुळे या व्यवस्थेत जलद व दैनंदिन पद्धतीने बिलावरची संपूर्ण प्रक्रिया करण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे ग्राहकांना जास्तीत जास्त अचूक बिल मिळणार आहे. वीज बिल भरण्यासाठी अधिकचा कालावधी मिळाल्यामुळे भरणा केंद्रातील रांगा कमी होऊन ते भरणे अधिक सोयीचे होईल. 

मुख्यालयातील सर्व्हरवर बिल तयार करण्यात येणार असून हे बिल परिमंडलस्तरावर वीजबिल वितरणासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या एजन्सीकडे 24 तासात पाठविण्यात येईल. त्यानंतर या एजन्सीकडून सदर वीजबिल शहरी भागात 48 तासात आणि ग्रामीण भागात 78 तासात वितरित करण्यात येईल. दिलेल्या मुदतीत ग्राहकांना वीजबिल न देणाऱ्या एजन्सींना दंड आकारण्यात येईल. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांना वेळेत वीजबिल मिळून प्रॉम्ट पेंमेंट डिस्कॉऊंटचा लाभ घेता येईल. 

वीजबिलाच्या केंद्रीकरणाचे फायदे :
या नावीन्यपूर्ण प्रक्रियेमुळे वसुली कार्यक्षमतेत वाढ होईल. थकबाकी तसेच वाणिज्यिक हानीत घट होईल. उपलब्ध मनुष्यबळाचे प्रभावी नियोजन करता येईल. बिलींग, छपाई व वितरण खर्चात मोठी बचत होणार आहे. संपूर्ण व्यवस्थेवर केंद्रीय स्तरावरून नियंत्रण राहील. बिलींग तक्रारीच्या प्रमाणात घट व संपूर्ण बिलींग व्यवस्थेवर माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नियंत्रण राहणार आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.