फांदी मोडली अन्‌ त्यांचा जीव वाचला 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

तालुक्‍याच्या विविध भागात हत्तींचे आगमन झाले आहे. हत्तरवाड-गुंडपी परिसरात दोन टस्करांनी तळ ठोकला आहे. तर शिवठाण जंगलात तीन हत्तींचा मुक्काम आहे. परिसरातील भातपिकांचे त्यांनी प्रचंड नुकसान चालविले आहे.

खानापूर ( बेळगाव ) - पिक राखणीसाठी गेलेल्या तिघा शेतकऱ्यांवर हत्तींच्या कळपाने हल्ल्याचा प्रयत्न केल्याची घटना शिवठाण (ता. खानापूर) शिवारात घडली. झोपलेल्या ठिकाणी चाल करुन येताना झाडाची फांदी मोडल्याचा आवाज झाल्याने वेळीच जागे झालेल्या शेतकऱ्यांनी गावच्या दिशेने धूम ठोकली. सुदैवाने ते बचावले असले तरी भातपिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

तालुक्‍याच्या विविध भागात हत्तींचे आगमन झाले आहे. हत्तरवाड-गुंडपी परिसरात दोन टस्करांनी तळ ठोकला आहे. तर शिवठाण जंगलात तीन हत्तींचा मुक्काम आहे. परिसरातील भातपिकांचे त्यांनी प्रचंड नुकसान चालविले आहे. त्यामुळे, पिकांच्या राखणीसाठी गेलेले शेतकरी शिवारातील मचाणीवर झोपले होते. झाडाची फांदी मोडल्याच्या आवाजाने त्यांना जाग आली. त्यांनी विजेरीच्या उजेडात पाहिले असता हत्तींचा कळप त्यांच्या दिशेने चाल करून येत दिसले. त्यांनी त्वरित गावच्या दिशेने पळ काढला. शिवारात हत्तींचा मुक्त संचार असल्याने शेतकरी राखणीला जाण्यास घाबरत आहेत. एकीकडे पिकांचे नुकसान होत असतानाच आता जीवालाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे, वनखात्याने हत्तींना पिटाळून लावावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

हेही वाचा -  महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी हे दोन मंत्री समन्वय ठेवणार 

गव्यांकडून भात पिकाचे नुकसान

पडलवाडी-कापोली परिसरात गव्यांनी भातपिकांचे नुकसान चालविले आहे. कापून ठेवलेले भात ते फस्त करत आहेत. दिवसाढवळ्या गव्यांचा वावर वाढला असून शिवारात जायलाही भिती वाटत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. वनखात्याकडून प्राण्यांच्या हैदोसाकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

नागरगाळी व लोंढा वनविभागात एकच हत्ती आहे. तीन हत्ती असल्याची निश्‍चित माहिती नाही. पिकांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी व भरपाईसाठी शेतकऱ्यांचे अर्ज येत आहेत. पंचनामा करुन भरपाई देण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. हत्तींकडून हल्ल्याच्या प्रयत्नाबाबत काही माहिती मिळालेली नाही. तसे असेल तर चौकशी केली जाईल. 
- एस. एस. निंगाणी, वनक्षेत्रपाल, लोंढा  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elephant Attack On Farmer In Shivthan Khanapur Taluka