खासगी सावकारीच्या जोरावर गावागावांत दहशतीचे साम्राज्य 

अजित झळके  | Thursday, 13 August 2020

मिरज पूर्व भागातील संतोषवाडी येथील नारायण वाघमारे या शेतकऱ्याने खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली.

सांगली : मिरज पूर्व भागातील संतोषवाडी येथील नारायण वाघमारे या शेतकऱ्याने खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणात दोन खासगी सावकारांची नावे समोर आली आहेत. खासगी सावकारीचा परवाना आहे की जीव घ्यायचा, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. बेहिशेबी मालमत्ता बाळगणाऱ्या आणि गावागावांत वसुलीसाठी गुंडांचे नेटवर्क उभे करणाऱ्या या सावकारांना राजकीय अभय आहे. केवळ परवान्याच्या जोरावर त्यांनी दहशतीचे साम्राज्य तयार केले आहे. 
नारायण वाघमारे यांनी तीन पानाचे पत्र लिहून आत्महत्या केली आहे. हे पत्र खासगी सावकारांची पोलखोल करेल, अशी अपेक्षा आहे. ज्या सावकारांचे या प्रकरणी नाव आले आहे, त्यांच्या कामाची पद्धत पोलिसांनाही नवी नाही. तरीही त्यांच्यावर अंकुश ठेवला जात नाही. त्यांनी कित्येकांची वाहने नेली, कित्येकांच्या जमिनी विकायला लावल्या, मूळ मुदलाच्या कित्येक पट व्याज आकारणी केली. ही मंडळी स्वतः फार चित्रात येत नाहीत. त्यांनी गावांमध्ये गुंड नेमले आहेत. त्यांच्या धमक्‍या रोजच्याच. गावातून फिरणे मुश्‍किल. जीवंत सोडणार नाही, घर उद्‌ध्वस्त करून टाकू, माती खायला लावू, मातीत मिसळून टाकू या भाषेत हे लोक बोलतात. काही सज्जनपणाचा बुरखा पांघरलेले लोकही दलाल आहेत, हे अधिक धक्कादायक आहे. या लोकांच्या पैशावर खासगी सावकारीचे "मायक्रो' रुप विस्तारले आहे. 

मायक्रो फायनान्स, पुरुष बचत गट, भिशी या गोंडस नावाखाली खासगी सावकारीने मूळ रोवली आहेत. त्याला पैसा येतो कुठून? हा पैसा पुरवणारे हेच खासगी सावकार आहेत. भिशीच्या नावाखाली चालवण्यात आलेली लूट तर भयानक आहे. आधी भिशी बंद पाडली पाहिजे, तर गावांतून खासगी सावकारीला हद्दपार करणे शक्‍य आहे. या काळ्या धंद्यात काही महिलांचा थेट सहभाग आहे. कित्येकांच्या घरांची त्यांनी रांगोळी केली आहे. 

या खासगी सावकारांच्या बेहिशेबी मालमत्तांची चौकशी लावण्याची गरज आहे. सावकारीचा परवाना म्हणजे काहीही करण्याचा अधिकार, असा त्यांचा समज झाला आहे. त्या जोरावर खुली दहशत सुरु आहे. आता या प्रकरणात जी नावे समोर आली आहेत किंवा अन्य प्रकरणात जी नावे समोर येताहेत, त्यांच्या मालमत्तांची खुली चौकशी झाल्यास त्यांना दणका देता येईल. फक्त पोलिसांनी लागेबांधे बाजूला ठेवून सामान्य लोकांच्या बाजूने उभे राहण्याची भूमिका घेतली पाहिजे.  

संपादन : प्रफुल्ल सुतार