कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांत साप, विंचू...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

वडूज - येथील पंचायत समितीमधील कर्मचारी निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे. इमारतीची पडझड झाली आहे. परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, सर्पांचा वावर वाढला आहे. परिणामी पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांना खासगी निवासस्थानांत राहावे लागत आहे. तेथे नवीन निवासस्थाने बांधण्याच्या इमारतीचा प्रस्तावदेखील मंत्रालय पातळीवर धूळखात पडला आहे.

वडूज - येथील पंचायत समितीमधील कर्मचारी निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे. इमारतीची पडझड झाली आहे. परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, सर्पांचा वावर वाढला आहे. परिणामी पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांना खासगी निवासस्थानांत राहावे लागत आहे. तेथे नवीन निवासस्थाने बांधण्याच्या इमारतीचा प्रस्तावदेखील मंत्रालय पातळीवर धूळखात पडला आहे.

पंचायत समितीच्या पाठीमागील बाजूस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची सहा ते आठ खोल्यांची स्लॅबची इमारत आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी येथे कर्मचारी राहत देखील होते. मात्र, नंतरच्या काळात या खोल्यांची दुरवस्था होऊ लागली. दुरुस्ती, डागडुजीकडे दुर्लक्ष केले गेल्यामुळे दिवसेंदिवस या खोल्यांची दयनीय अवस्था बनली आहे. निवासस्थानांच्या परिसरात गाजर गवताने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. आतमधील विजेचे साहित्यही खराब झाले आहे. निवासस्थानांच्या खोल्यांच्या इमारतीच्या दारे, खिडक्‍या, चौकटी मोडल्या आहेत. स्लॅबचे छत उखडले आहे. आतमधील इमारतीचे सिमेंटचे प्लॅस्टरही उखडले आहे. दारे, खिडक्‍यांवर वेली वाढल्या आहेत. निवासस्थानांभोवती घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने परिसरात सर्प, विंचू अशा श्वापदांचा वावर वाढला आहे. त्यामुळे याठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांनी ही निवासस्थाने सोडून खासगी ठिकाणी वास्तव्य केले आहे. याठिकाणी नवीन निवासस्थानांची इमारत बांधण्यासाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्चाचा नूतन इमारतीचा प्रस्तावही मंत्रालयात पाठविला आहे. मात्र, पुरेशा पाठपुराव्याअभावी तो तसाच रखडला आहे. 

‘‘निवासस्थानांच्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना भेटून इमारतीचा प्रस्ताव तातडीने मंजुरीसाठी पाठपुरावा करू. पंचायत समिती परिसर व इमारतीचा कायापालट घडवू.’’ 
-संदीप मांडवे,  सभापती, खटाव पंचायत समिती

‘‘निवासस्थान इमारत बांधण्यासाठीचा दोन कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव सध्या मंत्रालय पातळीवर मंजुरीसाठी आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास निवासस्थानांची इमारत बांधता येईल.’’ -डॉ. तानाजी लोखंडे, गटविकास अधिकारी, खटाव पंचायत समिती

Web Title: Employees of residential snakes, scorpions