रोजगाराची ५१ लाख युवकांना गरज

विशाल पाटील
शनिवार, 14 जुलै 2018

सातारा - नोकरी हवी आहे, तर प्लेसमेंट कंपन्यांत बायोडाटा द्या... जॉबसाठी कंपन्यांचे दरवाजे ठोठवा... कंपन्यांच्या मेलवर बायोडाटा पाठवत राहा... यापासून आता बहुदा सुटका मिळणार आहे... कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने ‘महास्वयम्‌ ॲप’ बनविले असून, त्यावरच नोकरीसाठी इच्छुकांना बायोडाटा तयार करता येणार आहे. शिवाय, उद्योजकही ‘वॉन्टेड’ ची माहिती त्यावर देऊ शकतात. राज्यातील तब्बल ५१ लाख युवक-युवतींनी नोकरीसाठी नोंदणी केली आहे.

सर्वाधिक युवा देश असलेल्या भारतात सुशिक्षित बेरोजगारांची समस्या प्रचंड वेगाने वाढत आहे. शिक्षण घेऊनही रोजगार निर्मितीबाबत माहिती उपलब्ध होत नाहीत. परिणामी ‘जॉब सर्च’मध्ये उमेदीची तीन ते चार वर्षे निघून जातात. यातून युवा पिढीत नैराश्‍य येते. शैक्षणिक गुणवत्तेनुसार नोकरी न मिळाल्याने युवाशक्‍तीचे भविष्य अंधारात जात असते. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने ‘महास्वयम्‌’ पोर्टलनंतर आता ‘महास्वयम्‌ ॲप’ निर्माण केले आहे. नोकरी इच्छुक, प्रशिक्षणार्थी, उद्योजक होऊ इच्छिणाऱ्यांना या विभागाने एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. 

या तिघांची सांगड घालून नोकरी इच्छुकांसाठी नोकरीच्या संधी पुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रशिक्षण संस्था कोणते प्रशिक्षण, कोठे, कधी देणार आहे, याची इथ्यंभूत माहितीही या ॲपवर उपलब्ध असते. शिवाय, कंपनीधारक, उद्योजकांना भरावयाच्या रिक्‍त पदांची माहितीही त्या ॲपवर देता येत आहे. शिवाय, किती इच्छुकांनी त्यास नोंदणी केली आहे, याची 
माहितीही उद्योजकांना मिळणार आहे. अँड्रॉइड आधारित हे मोबाइल ॲप असल्याने त्याची सुविधा नि:शुल्क उपलब्ध आहे. 

लाभार्थ्यांची नोंदणी, स्किल कॅलेंडर, प्रशिक्षण केंद्र शोधणे, त्यांचा पत्ता, संपर्क क्रमांक अशा अनेक सुविधा त्यात उपलब्ध आहेत. त्या मिळविण्यासाठी प्रत्येकवेळी लॉगिन करण्याची आवश्‍यकताही लागत नाही.

जॉबसाठी ॲप्लाय करता येईल
काही विशेष सुविधांसाठी लॉगिन करणे आवश्‍यक असते. त्याचा वापर करून स्वत:चा ऑनलाइन बायोडाटा तयार करता येतो. त्यातून कंपनीमध्ये नोकरीसाठी नोंदणी करता येत आहे. तसेच कौशल्य विकास, रोजगार विभागाने रोजगार मेळाव्याचे आयोजन केले असल्यास त्याची नोंदणीही करता येत आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक सचिन जाधव यांनी दिली.

५१,३१,७६२ नोकरी इच्छुक
७५,६२९ - नोंदणीकृत उद्योजक

Web Title: employment 51 lakh youth need