रोजगारनिर्मितीसाठी मधपालन योजना

Honeykeeping
Honeykeeping

कऱ्हाड - मध हा शेतीपूरक उद्योग न ठरता मुख्य व्यवसाय ठरून त्यातून रोजगारनिर्मिती व्हावी आणि मध उत्पादन वाढीबरोबरच शेतीचे उत्पादन वाढावे, यासाठी मधपालन योजना राज्यात राबवण्यात येणार आहे. जास्तीत जास्त शेतकरी आणि तरुणांनी या योजनेकडे वळून त्यातून आर्थिक प्रगती साधावी, यासाठी शासनाकडून त्यासंदर्भातील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. 

शेती व्यवसाय अधिक फायदेशीर होण्यासाठी शासनामार्फत विविध योजना राबवण्यात येत आहेत. मधमाशांमुळे शेती उत्पादनात भरघोस वाढ होत असल्याने मध उद्योगाला चालना देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे.

मध उद्योग हा केवळ शेतीपूरक व्यवसाय व जोडधंदा म्हणून न करता एक मुख्य उद्योग म्हणून केल्यास त्यातून ग्रामीण रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, हाही हेतू या पाठीमागे ठेवण्यात आला आहे. मधमाशांच्या मधपेट्या शेती पिके व फळबागायतींच्या ठिकाणी तसेच जंगलात ठेवल्यास मधमाशांद्वारे पर-परागीभवन होऊन पिकांच्या उत्पादनात पिकांच्या प्रकारानुसार पाच ते ४५ टक्के उत्पन्नात वाढ होण्याची शक्‍यता असते. पिके आणि निसर्गसंपदेच्या जोरावर राज्यात मध उद्योग चांगला चालू शकेल, याचा अंदाज शासनाला आल्याने शासनाने मध उद्योग वाढून त्यातून रोजगारनिर्मिती होण्यासाठी ही योजना राज्यात राबवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत मशमाशापालन ही योजना राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत महाबळेश्वर येथे मध संचालनालय कार्यरत आहे. त्याअंतर्गतच ही योजना खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत राबवण्यात येणार आहे. त्यासाठी मधपाळांची निर्मिती करण्यात येणार आहे.

त्यांना आवश्‍यक ते सर्व प्रशिक्षण देवून त्यांना केंद्रचालक मधपाळ म्हणून कार्यरत ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यामार्फत माशांच्या वसाहतींची निर्मिती करणे, मधमाशा व्यवसाय करणाऱ्यांना प्रशिक्षण देणे, उत्पादित मध गोळा करणे आदी कामे केली जाणार आहेत. केंद्रचालक मधपाळ तयार करण्यासाठी उद्योजक, संस्था यांच्याकडून खादी ग्रामोद्योग मंडळाकडून जाहिरातीव्दारे अर्ज मागण्यात येवून त्यांची कार्यवाही केली जाणार आहे. निवडीनंतर त्यांना महाबळेश्वर येथील मध संचालनालयात २० दिवसांचे निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

मधविक्रीस मुभा 
खादी ग्रामोद्योग मंडळाकडे नोंदणीकृत झालेल्या मधपाळांना देण्यात आलेल्या मधपेट्यांच्या प्रमाणात मधाची खरेदी मंडळामार्फत ठरवून दिलेल्या हमीभावाने करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ज्यांना उत्पादित मध बाहेर विकायचा आहे, त्यांना मध बाहेर विकण्यासही शासनाकडून मुभा देण्यात आल्याचे सूचीत करण्यात आले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com