अतिक्रमणे अखेर तोडलीच..!

दौलत झावरे
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या संरक्षक भिंतीला लागूनच सुमारे 40 जणांनी व्यवसाय थाटले होते. यामध्ये फळविक्रेते, चहाच्या टपऱ्या, भेळविक्रेत्यांचा समावेश होता. अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आल्यामुळे येथील सर्व व्यवसायिकांची एकच पळापळ झाली.

नगर :  जिल्हा परिषदेसमोर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. त्या अतिक्रमणाचा त्रास जिल्हा परिषदेमध्ये ये-जा करणाऱ्यांना नेहमीचाच. त्याबाबत संबंधितांना अनेकदा समज दिली. मात्र, त्यांनी त्याकडे कानाडोळा केला. अखेरीस वैतागलेल्या जिल्हा परिषद प्रशासनाने याबाबत महापालिका प्रशासनास विनंती केली. महानगरपालिकेनेही त्याची तातडीने दखल घेतली. कालच्या पाहणीनंतर आजच ही अतिक्रमणे अक्षरश: तोडली. या मोहिमेने अतिक्रमणधारकांची धावपळ उडाली.

जिल्हा परिषद इमारतीच्या बाजूने संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. या इमारतीत जाण्यासाठी तीन प्रवेशद्वारे आहेत. मात्र, त्यांतील दोनच सध्या वापरात आहेत. त्यातील तिसरे प्रवेशद्वार अतिक्रमणामुळे बंद ठेवण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या संरक्षक भिंतीला लागूनच सुमारे 40 जणांनी व्यवसाय थाटले होते. यामध्ये फळविक्रेते, चहाच्या टपऱ्या, भेळविक्रेत्यांचा समावेश होता. अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आल्यामुळे येथील सर्व व्यवसायिकांची एकच पळापळ झाली.

जिल्हा परिषदेच्या संरक्षण भिंती लगत असलेल्या सर्व अतिक्रमणावर हातोडा चालविण्यात आला. त्यामुळे जिल्हा परिषदेसमोर आज मोकळा रस्ता दिसून येत होता. हे अतिक्रमण हटविल्याने या रस्त्याचा कोंडलेला श्‍वास मोकळा झालेला आहे. ही मोहीम राबविल्यानंतर या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत होते.

अतिक्रमण हटविण्यात आले मात्र या मोकळ्या जागेमध्ये रिक्षा चालकांनी आपला ताबा घेतलेला आहे. अतिक्रमणे हटविली तशी रिक्षा चालकांनाही या भागात उभे राहून देऊन नये, व त्यांचे अतिक्रमण होऊन देऊन नये, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे. अतिक्रमण मोहीम महापालिकेच्या नगररचना व अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपअभियंता सुरेश इथापे, सुरेश मिसाळ, राहुल तनपुरे आदींच्या पथकाने केली.

रिक्षाबाबत पोलिसांशी अधिकारी बोलणार का?
जिल्हा परिषदेसमोर रिक्षा चालकांचा वापर कायम असतो. या रिक्षांचा जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्या अभ्यागतांना कायम अडथळा ठरत आहे. जिल्हा परिषदेसमोरील अतिक्रमणाबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ते हटविण्यासाठी पुढाकार घेतला. तसाच पुढाकार जिल्हा परिषदेसमोरील रिक्षांचा अडथळा दूर करण्यासाठी घेणार का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

पोलिस बंदोबस्त नसताना धाडसी कारवाई
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने विनापोलिस बंदोबस्त हे अतिक्रमण हटविले आहे. त्याबद्दल महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे सर्वच स्थरातून कौतुक केले आहे. दोन अधिकारी व 15 कर्मचाऱ्यांनी ही मोहीम फत्ते केली.

पुढची जबाबदारी तुमचीच..!
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जिल्हा परिषदेच्या समोरील अतिक्रमण हटवून त्यांचे काम आज (मंगळवारी) फत्ते केले. परंतु या पुढे जिल्हा परिषदेच्या समोर अतिक्रमण होऊ नये, याची जबाबदारी आता जिल्हा परिषदेला घ्यावी लागणार आहे. जर त्यांनी ही जबाबदारी घेतली नाही तर अतिक्रमण झाल्यास त्याची जबाबदारी जिल्हा परिषद प्रशासनाची राहणार आहे.

एक तासात भुईसपाट
अतिक्रम हटाव मोहिमेला सकाळी दहा वाजता सुरवात करून ती अकरावाजता पूर्ण करण्यात आली. एक तासाता 40 अतिक्रमणाचा सुपडा साफ करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The encroachment has finally broken ..!