सांगलीत ‘सिव्हिल’ला खोक्‍यांचा विळखा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

सांगली - पद्मभूषण वसंतदादा शासकीय रुग्णालयाच्या रस्त्यावरील अतिक्रमणाने एका महिलेचा बळी घेतला. दिरासोबत दुचाकीवरून जाताना ट्रकखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात नसून रस्त्यावर लावलेल्या बेकायदेशीर टपऱ्या, गाडे, गॅरेजच्या बेबंदशाहीचा बळी आहे. दोनशे मीटर रस्त्याला तब्बल १०२ खोकी, १५ हातगाड्यांसह अनेक अतिक्रमणांनी वेढले आहे. 

सांगली - पद्मभूषण वसंतदादा शासकीय रुग्णालयाच्या रस्त्यावरील अतिक्रमणाने एका महिलेचा बळी घेतला. दिरासोबत दुचाकीवरून जाताना ट्रकखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात नसून रस्त्यावर लावलेल्या बेकायदेशीर टपऱ्या, गाडे, गॅरेजच्या बेबंदशाहीचा बळी आहे. दोनशे मीटर रस्त्याला तब्बल १०२ खोकी, १५ हातगाड्यांसह अनेक अतिक्रमणांनी वेढले आहे.

संवेदनशील परिसर असलेल्या रस्त्यावर पानटपऱ्या, चहागाडे, फळविक्रेते, गॅरेज आणि नाना तऱ्हेचे धंदे ठाण मांडून बसलेत. त्यांना खुली सूट दिलीय कुणी? त्यांच्यावर कुणाची मेहरबानी आहे? पोलिस, महापालिकेला या जीवघेण्या खेळाविषयी काहीच वाटत नाही, संवेदना इतक्‍या बोथट झाल्या आहेत का, असा संताप सांगलीकर व्यक्त करताहेत.  

दुपारी तीनची वेळ होती. पूनम विठ्ठल शिंदे (वय २७) या दिराच्या दुचाकीवरून समडोळी येथे पाहुण्यांकडे गारवा घेऊन निघाल्या होत्या. सोबत छोटा मुलगा, दिराचा मुलगा होता. उत्तरेकडून ट्रक येत होता. दिराने दुचाकी सावकाश घेतली. मात्र समोरून एक महिला आली, तिला चुकवण्याच्या प्रयत्नात गाडीचा ताबा सुटला. एक ट्रक जाऊन बाजूला रस्ता राहील, इतकी जागाही रस्त्यावर नाही. दुचाकीवरून पूनम खाली पडल्या, त्यांच्या डोक्‍यावरून ट्रकचे चाक गेले. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. पूनम यांच्या नातलगांना त्यांचा चेहराही पाहता आला नाही. हे पाप कुणाचे? 

शासकीय रुग्णालयाचा रस्ता व परिसर संवेदनशील आहे. सांगलीसह कोल्हापूर, सोलापूर, विजापूर जिल्ह्यातील अत्यवस्थ रुग्णांना येथे आणले जाते. भोंगा वाजवत रुग्णवाहिका धावत येतात. त्यांना रस्ता मिळत नाही. वाहतुकीची कोंडी होते. या रस्त्यावरील सारेच्या सारे फुटपाथ गिळंकृत झालेत. एका फूटपाथवर रिक्षा थांबा आहे. तो अधिकृत आहे का? दुसऱ्यावर फळाचे गाडे लागलेत. पुढे पानटपऱ्या, गॅरेजनी रस्ता काबीज केलाय. तब्बल १०२ खोक्‍यांनी बस्तान मांडलेय. दहशत वाटावी, इतका हा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलाय.  

महापालिकेच्या संवेदना कधीच संपल्या आहेत. मात्र किमान ज्या कारणाने लोकांचा जीव जातोय, तेथे तरी कारवाईचा हातोडा चालवायला नको का? जीव गेला तरी पाहत बसणार आहेत का? असा संताप लोक व्यक्त करताहेत.

रस्त्याची रुंदी किती?
वसंतदादा शासकीय रुग्णालयाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता ते शंभर फुटी रस्ता याची रुंदी किती? कधी या गोष्टीची तपासणी महापालिकेने केली आहे का? हा रस्ता अतिक्रमणांनी गिळला तरी कुणाला देणेघेणे नाही. अतिक्रमण तातडीने हटवण्याची मोहीम हाती घेतली पाहिजे. अन्यथा काही बळी रस्त्यावर अपघात होऊन जातील तर काहींनी रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत सापडल्याने जीवाला मुकावे लागेल. टपरीवाल्यांच्या हप्त्यांपेक्षा लोकांचा जीव महत्त्वाचा नाही का? 

Web Title: Encroachment issue in Sangli