एसटीची जागा 56 वर्षांपासून पडीक

Encroachment on the premises of ST
Encroachment on the premises of ST

राहुरी : बसस्थानक इमारतीचे स्ट्रक्‍चरल ऑडिट व्हावे. नवीन इमारतीचा आराखडा व खर्चाचे अंदाजपत्रक तयार करावे. एसटी महामंडळातर्फे दुर्घटना होण्यापूर्वी इमारतीचे बांधकाम व्हावे. राहुरी बसआगारासाठी संपादित जमिनीचा 56 वर्षांत वापर झाला नाही. ही जमीन मूळ मालकास परत द्यावी किंवा शासनाकडे हस्तांतरित करून राहुरी पालिकेच्या ताब्यात द्यावी. त्या बदल्यात आगारासाठी शहराबाहेर शासनाच्या मालकीचे जास्तीचे क्षेत्र संपादित करावे, अशा मागण्या माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केल्या आहेत. 


"सकाळ'शी बोलताना तनपुरे म्हणाले, ""बसस्थानक इमारत कोसळण्याच्या मार्गावर आहे. याविषयी वर्षापूर्वी एसटी महामंडळाच्या जिल्हा नियंत्रकांशी लेखी पत्रव्यवहार केला होता; परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. जिल्ह्यातील मंत्री झालेल्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या बसस्थानक इमारतींचे प्रश्न मार्गी लावले. राहुरीचा प्रश्न उपेक्षित राहिला. राहुरी नगरपालिका व विविध स्वयंसेवी संस्थांतर्फे वेळोवेळी स्थानक आवारात स्वच्छता केली जाते. वास्तविक, राज्यातील सर्व बसस्थानके व आवारातील स्वच्छतेचा कोट्यवधी रुपयांचा ठेका मुंबईच्या "ब्रिक्‍स' कंपनीने घेतला आहे; परंतु वृत्तपत्रांनी आवाज उठविल्यावरच स्वच्छतेकडे लक्ष दिले जाते.'' 

जमिनीवर बाभळी व झाडेझुडपे

ते म्हणाले, ""राहुरीच्या बसआगारासाठी 1963मध्ये बालाजी मंदिर देवस्थान ट्रस्टची 36 गुंठे जमीन संपादित केली. नगर-मनमाड महामार्गानजीक कोट्यवधी रुपयांची जमीन महामंडळाच्या ताब्यात आहे. मागील 56 वर्षांत आगाराचा प्रश्न सुटला नाही. मंदिराशेजारील या जमिनीवर बाभळी व इतर झाडेझुडपे आहेत. अतिक्रमणेही झाली आहेत. महामंडळाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मंदिर परिसराचे सौंदर्य नष्ट झाले आहे.'' 

पालिकेतर्फे उद्यान उभारा

""आगारासाठी तांत्रिकदृष्ट्या जमीन अपुरी आहे. जमीन मूळ मालकाला परत करावी किंवा शासनाकडे हस्तांतरित करून पालिकेच्या ताब्यात द्यावी. पालिकेतर्फे तेथे उद्यान उभारून मंदिराची शोभा वाढविता येईल. दर्शनानंतर भाविकांना उद्यानात बसण्याची सोय होईल. त्या बदल्यात आगारासाठी शहराबाहेर शासनाच्या मालकीचे जास्त क्षेत्र संपादित करावे म्हणजे आगाराचा प्रश्नही सुटेल,'' असे तनपुरे यांनी सांगितले. 

राहुरी बसस्थानकाची स्वच्छता 
राहुरी बसस्थानकाच्या दुरवस्थेबाबत "सकाळ'मध्ये बातमी प्रसिद्ध होताच आवारात स्वच्छता करण्यात आली. कचराकुंड्या साफ झाल्या. सुलभ शौचालयाची दुर्गंधी कमी करण्यासाठी स्थानकप्रमुख अनिल निकम यांनी शौचालयाच्या ठेकेदारास, फुटलेल्या मलमूत्र वाहिनीच्या दुरुस्तीचा आदेश देऊन उपाययोजना करण्यास सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com