सांगलीत एसटी स्थानकाला अतिक्रमणांचा विळखा

सांगलीत एसटी स्थानकाला अतिक्रमणांचा विळखा

सांगली - शहराचे नाक असलेल्या मध्यवर्ती  बस स्थानकाच्या सभोवती वडापचालक आणि खोकीधारक-फेरीवाल्यांचा अक्षरशः विळखा पडला आहे. इथे वाहतूक पोलिस फक्त दंड ठोठावण्यासाठीच उभे असतात,  तर येथील सर्व हॉटेल्स व दुकानदारांनी जणू एकमेकांच्या ईर्षेने रस्त्यापर्यंत अतिक्रमणे केली आहेत. 

कधीकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळाही रिक्षांच्या गराड्यात असायचा. तेथील रिक्षा थांबा हटवून तो शेजारच्या बोळात नेल्याने स्थानकाच्या प्रवेशद्वारावरील कोंडीचा मोठा ताण संपला. मात्र रिक्षावाले पूर्वीच्या थांब्यावर एखाद दुसरी रिक्षा थांबवतात. तसेच आता वडापचालकांनी प्रवेशद्वारापासून दीनानाथ  चौकापर्यंत रस्ता व्यापला आहे. पलीकडच्या लक्ष्मी हॉटेलपासून उदगावकर यांच्या दवाखान्यापर्यंती हीच स्थिती आहे. हे दोन्ही रस्ते जीप, पॅगो रिक्षा, टेंपो आणि खासगी प्रवासी कारनी दिवसभर व्यापलेले असतात. याकडे पोलिसांचे मात्र दुर्लक्षच असते. स्थानकासमोरच्‍या एकेरी मार्गातून विरुद्ध दिशेने  गेल्याबद्दल दंड ठोठावण्यासाठीच ते उभे दिसतात. 

एसटी स्थानकाजवळच्या खोकीधारकांनी तर बहुमजली जागा व्यापली आहे. खोक्‍याच्या समोरच त्यांनी पुन्हा आठ-दहा फूट जागा व्यापली आहे. तेथेच भजीगाडे असतात. त्यांनी भर टाकून रस्ते ताब्यात घेतले आहेत. फळ विक्रेत्यांनी स्थानकात सहजासहजी जाता येणार नाही अशी व्यवस्था केली आहे. एसटी कॅन्टीनच्या दारात पानपट्टीचालकांनी ईर्षेने जागा ताब्यात घेतली आहे. डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोरची मोकळी जागाही खासगी बसचालकांनी दिवसभर व्यापलेली असते. 
नुकतेचे झुलेलाल चौकाचे सुशोभीकरण आणि रुंदीकरण झाले. या चौकात एसटी स्थानकाच्या पूर्व बाजूच्या खोकीधारकांनी हस्ते हस्ते हा चौकही व्यापण्यास सुरवात केली आहे.

सायंकाळच्या वेळी तर या  चौकात खोकीधारकांची दहा ते पंधरा फूट पुढे येऊन खुर्च्या-बाकडी टाकलेली दिसतात. पलीकडे कल्याणकर कॉम्प्लेक्‍ससमोरची पार्किंगची जागा तर अलीकडे लोखंडी खांब रोवून ताब्यात घेण्यात आली आहे. त्यामुळे या चौकात जत-कवठेमहांकाळकडे  जाणारी वडाप वाहने रस्त्यावरच थांबलेली असतात. या चौकात दोन दारू दुकाने आहेत. तेथून बाहेर पडणाऱ्या तर्र ग्राहकांना हा चौक पार करणे कठीणच असते. झुलेलाल चौकातून पत्रकारनगराकडे जाणाऱ्या रस्त्यावर खोकी पुनर्वसन करून विद्यमान सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या कार्यकाळात मोठी दिव्य कामगिरी पार पाडली होती. त्याची फळे आता भोगावी लागत आहेत. गटारावर खोकी बसवण्याचा पराक्रम करणाऱ्या महापालिकेने इथे खोकीधारकांचे पुनर्वसन करून कायमची डोकेदुखी लावून घेतली आहे.

राजकीय नेत्‍याचा पायंडा?
लोकप्रतिनिधी म्हणून स्वतः काही पायंडे घालून द्यायला हवेत. मात्र, जिल्ह्यातील एका लोकप्रतिनिधीचेच येथे हॉटेल आहे. या हॉटेलच्या दारातच कारगाड्या लावलेल्या असतात. हॉटेलच्या सभोवतीही त्यांनी साईड मार्जीनमध्ये हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची कार-दुचाकी वाहने पार्क केलेली असतात. पत्रकारनगराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कॉर्नरवर एका बाजूला हॉटेलचे पार्किंग आणि विरुद्ध बाजूला खोकीधारक-हातगाडीवाल्यांची अतिक्रमणे यातून सर्कस करीतच जावे लागते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com