
तलावांचे तातडीने सर्व्हेक्षण करुन अतिक्रमण हटविने गरजेचे बनले आहे.
बेळगाव : वडगाव भागातील शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणाऱ्या तलांवावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे तलावांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
त्यामुळे तलावांचे तातडीने सर्व्हेक्षण करुन अतिक्रमण हटविने गरजेचे बनले आहे. अन्यथा येणाऱ्या काळात जनावरांसाठी पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.
वडगाव परिसरात तीन तलाव आहेत. यापैकी दोन तलाव मंगाईनगर येथे तर एक तलाव वड्डर छावणी येथे एक येथे आहेत. या तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा होत होता. त्यामुळे परिसरातील शेतीला व जनावरांना सोडण्यासाठी हे तलाव उपयोगी पडत होते. मात्र तिन्ही तलावांमध्ये सात ते आठ, वर्षांपासून सातत्याने अतिक्रमण केले जात आहे. तसेच अनेक वर्षांपासून तलावातील गाळ काढण्यात आलेला नाही. त्यामुळे तलावातील गाळ काढणे आवश्यक बनले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी बैठक घेऊन तलावातील गाळ काढावा तसेच अतिक्रमण हटवावे अशी मागणी केली होती. तसेच याबाबत जिल्हाधिकारी, महापालीका व लघू पाठबंधारे विभागाला निवेदन दिले होते. मात्र शेतकऱ्यांच्या मागणीकडे पुर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
संबधित विभागाने सर्व्हेक्षण केल्यास ज्या लोकांनी तलावाच्या जागेवर अतिक्रमण केले आहे. हे दिसून येणार असून अतिक्रमण हटविण्यास मदत होणार आहे. मात्र सर्व्हेक्षण का केले जात नाही याबाबत कोणतीही स्पष्ट उत्तर दिले जात नाही. त्यामुळे अतिक्रमणाचा विळखा वाढून तलावांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. असे मत शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
वडगाव भागातील तलावांचे सर्व्हेक्षण करावे अशी मागणी अनेकदा करण्यात आली आहे. मात्र सर्व्हेक्षण केले जात नाही त्यामुळे अतिक्रमणात वाढ होत असून या भागात शेतकरी मोठ्या संख्येने आहेत. त्या शेतकऱ्यांसाठी हे तलाव वरदान ठरत होते. परंतु, अतिक्रमण झाल्याने तलावांचा आकार व पातळीत घट झाली आहे.
-अमोल देसाई, अध्यक्ष शेतकरी सुधारणा युवक मंडळ
हे पण वाचा - प्राध्यापकांना उत्सुकता; मुदतवाढ की थेट पाच वर्षांची नियुक्ती..?
अनेकांनी तलावांच्या शेजारी जागा घेऊन घर बांधले आहे. मात्र तलावातील माती अनेकदा घसरत असते. त्यामुळे भुस्सखलन झाले तर आजुबाजुच्या लोकांना त्रास होण्याची शक्यता आहे. तसेच वडगाव आणि परिसरातुन येणारे सांडपाणीही तलावात मिसळत आहे. त्यामुळे तलावातील पाणी दुषित होत आहे. याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. असे मत शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
संपादन - धनाजी सुर्वे