साताऱ्यात अतिक्रमणांचे साम्राज्य ; राजेंच्या सूचनांकडे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

सातारामधील वाढती अतिक्रमणांबाबत पालिकेचे अधिकारी अनभिज्ञ असल्यासारखे वागत आहेत. येथील पदपथ टपऱ्यांनी भरले आहेत. यामुळे पादचाऱ्यांना चालणेही मुश्‍किल झाले आहे.

सातारा : सातारा शहरातील सर्वच मुख्य रस्ते, शासकीय कार्यालयांभोवती अतिक्रमणांचे साम्राज्य पसरले आहेत. पदपथ पादचाऱ्यांसाठी नसून, ते टपऱ्या, दुकाने थाटण्यासाठी झाले आहेत. या रस्त्यांवर जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, अधीक्षक अभियंता, मुख्याधिकारी यांच्यासह शेकडो अधिकारी फिरतात. मात्र, त्यांना ही अतिक्रमणे दिसत नाहीत का? प्रशासनाने डोळ्यावर पट्टी बांधली आहे काय? असे संतप्त सवाल उमटत आहेत.

सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

सातारा शहर आणि अतिक्रमणांचे साम्राज्य हे समीकरणच होवून बसले आहे. सातारा चिकन सेंटरबाबत तक्रार झाल्यानंतर जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी ते अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले. त्यानंतरच सातारा पालिकेला जाग येऊन पालिकेने अतिक्रमणे हटविण्याची मोहीम उघडली. मात्र, त्यावर न्यायालयाची स्थगिती आल्याने अतिक्रमणमुक्‍तीने गाशा गुंडाळला.

वास्तविक, साताऱ्यातील रस्ते अतिक्रमणांच्या बोजांनी पुरते लयाला निघाले आहेत. मात्र, त्याकडे पाहण्यास, त्यावर कारवाई करण्याची जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, पालिकेचे मुख्याधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदारांना मात्र आवश्‍यकता वाटत नसल्याचे दिसून येत नाही.
 
नो हॉकर्स झोनमध्येही हातगाडे लावण्याचे धाडस

बस स्थानक रस्त्यावरून दररोज शेकडो विद्यार्थी, नागरिक ये-जा करत असतात. पदपथांवर हातगाडे, टपऱ्या, दुकाने असल्याने जीव मुठीत धरून त्यांना रस्त्यावरून चालावे लागते. ग्रेड सेपरेटरवर पदपथ नाहीत, त्यामुळे पादचाऱ्यांचा नव्याने प्रश्‍न निर्माण होणार आहे. नो हॉकर्स झोनमध्येही हातगाडे लावण्याचे धाडस अतिक्रमणधारक करत आहेत.

वाहतुकीचे नियम न पाळल्यास पोलिस लगेच वाहनचालकांवर कारवाई करतात. पण, वाहतूक नियमन होण्यासाठी अतिक्रमणे काढण्याबाबत तत्परता दाखवत नाहीत. बांधकाम विभाग तर सदैव गांधारीच्या भूमिकेत असतो.

पालिका प्रशासनाने डोळ्यावर पट्टी बांधली आहे. स्वच्छ, सुंदर शहर, स्वच्छ प्रशासकीय कार्यालये बनविण्याच्या केवळ घोषणा केल्या जात आहेत. मात्र, येथील सर्वसामान्य नागरिकांना पदपथावरून चालता यावे, एवढेही प्रशासन उपाययोजना करू शकत नाही. 

बगलबच्चांसाठी जनता वेठीस 

पदपथावर अतिक्रमणे करण्यास देऊन आपली राजकीय गणिते जुळविण्यासाठी लोकप्रतिनिधी सदैव तत्पर असतात. काहींनी तर या अतिक्रमणांचा बाजार मांडला आहे. त्यातूनही मालामाल होत आहेत. या अतिक्रमणांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष राजकीय पाठबळ मिळत असून, बगलबच्चांसाठी जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार होत आहे.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बैठकीत अतिक्रमणे काढण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, त्याचीही अद्याप दखल घेतली गेली नाही. 

हेही वाचा : ...तर फडणवीसांवर ही वेळ आली नसती 

अतिक्रमणांची ठिकाणे 

तहसील कार्यालय ते बस स्थानक रस्ता 
पालिका ते राजवाडा रस्ता (राजपथ) 
पोवई नाका ते मोती चौक (कर्मवीर पथ) 
बाजार समिती ते हुतात्मा उद्यान 
राजवाडा मंडई ते विठोबाचा नळ 
तांदूळ आळी ते नगरवाचनालय 
झेडपी चौक ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक

...यांना पडलाय गराडा 

जिल्हाधिकारी कार्यालय 
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय 
जिल्हा परिषद इमारत 
प्रशासकीय इमारत 
शासकीय विश्रामगृह 
मुख्य डाक कार्यालय 
राजवाडा व बस स्थानक 
साईबाबा मंदिर (गोडोली)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Encroachments In Satara Are Increasing Day To Day