नव्या नोटा संपल्या; जपून वापरा पैसा

नव्या नोटा संपल्या; जपून वापरा पैसा

जिल्ह्यात आर्थिक आणीबाणी : १२०० कोटी झाले जमा, आले फक्त ५०० कोटी

सांगली - केंद्र सरकारने नोटाबंदी जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात चलनटंचाईने गंभीर रूप धारण केले आहे. गेला महिनाभर रिझर्व्ह बॅंकेकडून नव्या नोटा आलेल्या नाहीत. आगामी आठवडाभरही पैसे येण्याची शक्‍यता नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे आठवडाभर आर्थिक आणीबाणीची परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्‍यता आहे. पाचशेच्या नव्या नोटाही जिल्ह्याला मिळालेल्या नाहीत. तर जिल्ह्यात सुमारे हजार कोटींच्या जुन्या नोटा पडून आहेत. त्या सांभाळण्याची कसरत बॅंका करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबरच्या आठ तारखेला नोटाबंदीचा सर्जिकल स्ट्राईक केला.

त्यामुळे पाचशे आणि एक हजारच्या जुन्या नोटा जमा करण्यास बॅंकांमध्ये गर्दी वाढली. त्यानंतर दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा सरकारने आणल्या. त्याही मर्यादित स्वरूपात, त्यामुळे ठराविक रकमेच्या वर नागरिकांना आपलेच पैसे मिळेनासे झाले आहेत. जिल्ह्यात याचा मोठा परिणाम झाला आहे. सर्व क्षेत्रांतील उलाढाली निम्म्याने कमी झाल्या आहेत, तर ग्रामीण भागातील अर्थकारण कोलमडले आहे. पुरेशा प्रमाणात चलनपुरवठा करू शकत नसल्याने सरकार कॅशलेस व्यवहाराचा आग्रह धरत आहे; मात्र त्यालाही मोठ्या प्रमाणात मर्यादा आहेत. त्यामुळे आर्थिक आणीबाणी निर्माण झाली आहे.

चार करन्सी चेस्टकडून चलनपुरवठा
जिल्ह्याला चार करन्सी चेस्टकडून चलनपुरवठा केला जातो. यामध्ये स्टेट बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ इंडिया, युनियन बॅंक आणि आयसीआयसीआय या बॅंकांचा समावेश आहे. यातही स्टेट बॅंकेच्या सांगलीतील मुख्य शाखेसह तालुक्‍याच्या ठिकाणी असलेल्या शाखांनाही चेस्ट करन्सी देण्यात येते.

आरबीआयकडून चलनपुरवठा नाही
सरकारने नोटा बंदी जाहीर केल्यानंतर या करन्सी चेस्टमध्ये रिझर्व्ह बॅंकेने नवीन दोन हजाराच्या आणि काही प्रमाणात पाचशेच्या नोटा पाठवल्या होत्या. तेवढ्यावर जिल्ह्यातील बॅंकांना चलन पुरवठा करून आजवर आर्थिक व्यवहार सुरू होते. मात्र आरबीआयकडून आलेले पैसेही आता संपले आहेत आणि नवीन चलन मिळण्यास काही दिवस लागण्याची शक्‍यता आहे. किमान चार दिवस ते आठवडाभर लागेल, अशी आशा बॅंक अधिकाऱ्यांना वाटत आहे. परंतु तोपर्यंत नागरिकांना पैसे कसे पुरवायचे, असा प्रश्‍न या बॅंकांसमोर पडला आहे.

बॅंकांकडील पैसे संपले!
आरबीआयकडून आलेले पैसेही आता संपले आहेत. स्टेट बॅंकेकडे सुमारे सव्वा दोनशे कोटी, तर बॅंक ऑफ इंडियाच्या चेस्ट करन्सीकडे १०५ कोटी रुपये आले होते. इतर चेस्ट करन्सीकडे अंदाजे ३५० कोटी रुपये आले होते. आता काही बॅंकांमध्ये दोन-तीन दिवस पुरतील एवढेच पैसे आहेत. त्यामुळे यापुढे कसे काम करायचे, हा प्रश्‍न त्यांच्यासमोर पडला आहे. आधीच रोज हुज्जत घालणाऱ्या नागरिकांची समजूत काढून बॅंक अधिकारी, कर्मचारीही कंटाळले आहेत. आता तर पैशाची टंचाई आणखी गंभीर होणार असल्याने ते हतबल झाले आहेत. वैद्यकीय, विवाह, मयत आदी कारणांनी संकटात सापडलेल्या नागरिकांना कसे सहकार्य करायचे, हा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. आजवर थोडे जादा पैसे काहीजणांना मानवतेच्या दृष्टिकोनातून देता येत होते. मात्र आता त्यालाही मर्यादा येणार आहेत.

पोलिस बंदोबस्त घ्यावा लागेल
एका बॅंक अधिकाऱ्याने सांगितले, की आणखी केवळ दोन दिवस पुरतील एवढेच पैसे काही शाखांमध्ये आहेत. ते जास्त दिवस पुरवण्यासाठी पैसे काढण्याची मर्यादा खाली आणावी लागेल. मात्र नागरिकांचा संताप रोखणार कसे? आता बॅंकेला पोलिस बंदोबस्त घेऊन काम करावे लागेल. पैसे संपल्यास केवळ इतर कामे उरतील. नागरिकांकडून जसे पैसे येतील तेच फिरवले जातील.

स्टेट बॅंकेने मर्यादा कमी केली
स्टेट बॅंकेने चलन टंचाईची गंभीरता लक्षात घेऊन खातेदारांना देण्यात येणाऱ्या पैशांची मर्यादा कमी केली आहे. आजपासूनच आठवड्याला शहरातील शाखांमध्ये केवळ चार हजार रुपये, तर ग्रामीण भागातील शाखांमध्ये केवळ दोन हजार रुपये देण्याच्या सूचना आल्या आहेत. त्यामुळे आर्थिक आणीबाणी आणखी गंभीर होणार आहे.

सुमारे एक हजार कोटी पडून
स्टेट बॅंकेकडे पाचशे आणि हजार रुपयांच्या सुमारे चारशे कोटी रुपयांच्या जुन्या नोटा पडून आहेत. त्यामुळे त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या ६० बॅंकांमध्येही अशा नोटा पडून आहेत. तसेच बॅंक ऑफ इंडियाकडेही एकूण ६७५ कोटी रुपये जमा झाले होते. त्यातील सुमारे २७५ कोटी रुपयांच्या नोटा पडून आहेत. त्यांच्या अंतर्गत ४८ शाखा आणि पाच बॅंका येतात. अशाच प्रकारे जिल्ह्यातील इतर बॅंकांचीही स्थिती आहे. या नोटा ठेवायच्या कुठे? असा प्रश्‍न बॅंकांसमोर आहे.

रिझर्व्ह बॅंकेतही गर्दी !
चेस्ट करन्सी पुरवणाऱ्या बॅंकांनी रिझर्व्ह बॅंकेकडे पैशाची मागणी केली आहे. मात्र तेथेही देशभरातील बॅंकांनी पैशासाठी गर्दी केली आहे. तेथे पैसे घेण्यासाठी बॅंक अधिकारी, कर्मचाऱ्यांची रांग लागली आहे. त्यामुळे तेथे नंबर आल्यानंतर आरबीआयकडून पैसे मिळतील. येत्या चार-पाच दिवसांत पैसे मिळवण्यासाठी बॅंका प्रयत्न करीत आहेत. रिझर्व्ह बॅंकेकडून गेल्या महिन्यात चलन पुरवठा झाला होता. त्यानंतर नवीन पुरवठा झालेला नाही.

पैसे जपून वापरा
आगामी आठवडाभर आर्थिक टंचाई वाढण्याची शक्‍यता बॅंक अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी पैसे जपून वापरावेत, असे आवाहन बॅंकांकडून करण्यात आले आहे. पुढील आठवड्यात पैसे उपलब्ध झाल्यानंतर चलन व्यवहार सुरळीत होतील, अशी अपेक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com