ट्रॅक्‍टरला इंजिन लावून पाणीउपसा

मनव - ट्रॅक्‍टरला इंजिन लावून दक्षिण मांड नदीतून सुरू असलेला पाणीउपसा.
मनव - ट्रॅक्‍टरला इंजिन लावून दक्षिण मांड नदीतून सुरू असलेला पाणीउपसा.

दक्षिण मांड नदीवरील स्थिती; पाणी असूनही नांदगाव ते काल्यापर्यंतची टंचाई कायम    

कऱ्हाड - दक्षिण मांड नदीकाठच्या गावचा पिण्याचा प्रश्‍न सोडवण्यासाठी वाकुर्डे योजनेचे पाणी दक्षिण मांड नदीत सोडण्यात आले. त्यामुळे त्या परिसरातील गावांना दिलासा मिळाला आहे; परंतु हे पाणी पिण्यासाठी असल्याने शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे, तरीही काही जणांकडून ट्रॅक्‍टरला इंजिन लावून पाणी उपसण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नांदगावपासून कालेपर्यंतच्या गावांतील लोकांना आवश्‍यक त्या प्रमाणात पाणी उपलब्ध होत नाही. 

उंडाळे विभागातील गावांचा पाणीप्रश्‍न सोडवण्यासाठी वाकुर्डे योजनेचे पाणी दक्षिण मांड नदीत सोडण्याचे प्रयत्न करण्यात आले. त्यातून परिसरातील अनेक गावांच्या पाण्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत झाली आहे. गेल्या वर्षी सोडलेल्या पाण्याचे ४० लाख रुपये बिल थकले होते. त्यामुळे यंदा वाकुर्डे योजनेचे पाणी गरज असेल तेव्हाही सोडण्यात आले नाही. परिणामी, नदीकाठची पिके पूर्णतः वाळून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसला.

त्यामुळे वाकुर्डे योजनेचे पाणी दक्षिण मांड नदीत सोडण्यासाठी लोकांचा दबाव वाढू लागला. थकीत बिल भरल्याशिवाय पाणी सोडता येणार नाही, असा पवित्रा अधिकाऱ्यांनी घेतला होता. पंचायत समिती, जिल्हा परिषद पातळीवर सातत्याने पाठपुरावा करून जिल्हा परिषद सदस्य ॲड. उदयसिंह पाटील व सहकाऱ्यांनी संबंधित थकीत रकमेपैकी निम्मी रक्कम भरून संबंधित योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार व अन्य पदाधिकाऱ्यांनीही संबंधित योजनेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा केला. 

वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा झाल्यामुळे अधिकाऱ्यांना वाकुर्डे योजनेचे पाणी दक्षिण मांड नदीत सोडावे लागले. सध्या हे पाणी नदीत पोचले आहे. ते पाणी प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी सोडण्यात आल्याने शेतीसाठी ते उपसले जाऊ नये, यासाठी शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करावा, असे आदेश तहसीलदार राजेंद्र शेळके यांनी दिले होते. त्यामुळे सध्या त्याकाठच्या शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

मात्र, त्यावर आता काही जणांनी ट्रॅक्‍टरला इंजिन लावून पाणी उपसण्याचा उतारा शोधला आहे. पाणी आहे तेथे उपसले जात असल्याने नांदगाव व त्याखालील गावांतील लोकांना आवश्‍यक त्या प्रमाणात पाणी पोचत नाही. परिणामी त्यांच्या पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. 

पिण्यासाठी पाणी द्या...
नांदगाव व त्याखालील गावांतील काही शेतकऱ्यांनी पाण्याची थकीत बिले भरली आहेत. त्यातून दक्षिण मांड नदीत पाणीही सोडण्यात आले. मात्र, पिण्याच्या पाण्याची विहिरी पूर्ण क्षमतेने भरत नसल्याने पिण्यासाठीही पाणी मिळत नाही. त्यामुळे बिल भरलेल्या शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. इंजिन लावणाऱ्यांवर कारवाई करून आम्हाला पिण्यास पाणी द्यावे, अशी मागणी त्या परिसरातील ग्रामस्थांतून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com