नगर - श्रीरामपूर येथे लाचप्रकरणी अभियंत्यास दहा वर्षे सक्तमजुरी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

श्रीरामपूर (नगर) : रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपाखाली येथील पंचायत समितीतील बांधकाम विभागाचा तत्कालीन शाखा अभियंता अशोक मुंढे यास दहा वर्षे सक्तमजुरी, तसेच 85 लाख रुपये दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली. येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. यू. बघेले यांनी आज हा निकाल दिला. 

श्रीरामपूर (नगर) : रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपाखाली येथील पंचायत समितीतील बांधकाम विभागाचा तत्कालीन शाखा अभियंता अशोक मुंढे यास दहा वर्षे सक्तमजुरी, तसेच 85 लाख रुपये दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली. येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. यू. बघेले यांनी आज हा निकाल दिला. 
याबाबतची अधिक माहिती अशी, जिल्हा परिषदेकडील नोंदणीकृत ठेकेदार जुनेद कलीम शेख यांनी सन 2016मध्ये गोंडेगाव- उंदीरगाव- खानापूर रस्त्याचे बीबीएम कारपेट, सिलकोट करणे, तसेच निमगाव खैरी ते नाऊर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ही कामे केली होती. त्यांपैकी एका कामाचे बिल शेख यांना मिळाले; मात्र दुसरे काम पूर्ण होऊन एक महिन्यानंतरही अभियंता मुंढेने सात लाख 50 हजारांचे बिल रेकॉर्ड केले नाही. त्या अनुषंगाने शेख यांनी मुंढेची भेट घेऊन बिल रेकॉर्ड करण्याची विनंती केली होती. तथापि, दिलेल्या व देणे राहिलेल्या बिलापोटी पाच टक्‍क्‍याप्रमाणे दीड लाख रुपयांची मागणी त्याने शेख यांच्याकडे केली होती. 

शेख यांनी तीन मे 2016 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दूरध्वनीवरून मुंढे यांच्याविषयी तक्रार केली. त्यावरून या विभागाचे पोलिस उपअधीक्षक आय. जी. शेख यांनी सहकारी व पंचांना बरोबर घेऊन जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहावर सापळा रचला. लाच म्हणून द्यायची रक्कम घेऊन शेख गेले तेव्हा मुंढेने रक्कम बॅगेत ठेवण्यास सांगितले. त्याच वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंढेला रंगेहात पकडत गुन्हा दाखल केला. 

या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश बघेले यांच्यासमोर झाली. सरकार पक्षातर्फे तक्रारदार शेख, पंच गणेश वाघेरे, लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक शेख, जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. युक्तिवादादरम्यान सरकारी वकील भानुदास तांबे यांनी विविध वरिष्ठ न्यायालयांचे निवाडे निदर्शनास आणून दिले. सुनावणीदरम्यान आलेला पुरावा, तसेच युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने मुंढेला शिक्षा सुनावली. ऍड. तांबे यांना सरकारी वकील प्रसन्ना गटणे, हवालदार एकनाथ जाधव व प्रशांत जाधव यांनी मदत केली. 

Web Title: Engineer for 10 years' imprisonment in Srirampur for bribe