धुळ्याच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

धुळ्याच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

कोल्हापूर - अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या धुळ्याच्या विद्यार्थ्याने कोल्हापुरात भाड्याच्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केली. शनिवारी (ता. 15) दुपारी हा प्रकार उघडकीस आला. विशाल उत्तम माळी (वय २३, मूळ धुळे, सध्या रा. आर. के. नगर, सोसायटी नंबर १) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. 

विशाल येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात बायोटेक्‍नॉलॉजीचे शिक्षण घेत होता. त्याच्या बहिणीसोबतच तो चार वर्षांपूर्वी कोल्हापुरात आला होता. बहिणीचे पती येथील शेंडा पार्कातील कृषी विभागात कामाला होते. बहिणीच्या घरीच तो सुरुवातीला राहात होता. दोन महिन्यांपूर्वी त्याच्या बहिणीच्या पतीची बदली अन्यत्र झाल्याने त्यांनी कोल्हापुरातील घर सोडले. त्यानंतर तो या परिसरात एका भाड्याच्या खोलीत राहात होता. शुक्रवारी रात्री मित्रांशी गप्पा मारून तो खोलीवर गेला. 

आज सकाळी तो नेहमीप्रमाणे बाहेर आला नाही. दुपारपर्यंत तो बाहेर न आल्याने घरमालकांसह त्याच्या मित्रांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता तो मृत अवस्थेत आढळला. त्याच्याशेजारीच एक विषाची पूर्ण रिकामी झालेली बाटली आढळून आली. करवीर पोलिसांनी ही माहिती कळवताच पोलिस आले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठवला. 

घटनेची माहिती पुणे व धुळे येथील राहणाऱ्या विशालच्या नातेवाइकांना फोनवरून दिली. पुण्याचे नातेवाईक त्याचा मृतदेह नेण्यासाठी कोल्हापुरात रात्री उशिरा आले. चार वर्षांपासून तो या परिसरात रहात असल्याने त्याचा मोठा मित्र परिवार होता. सीपीआरमध्येही त्याच्या मित्रांनी गर्दी केली होती. विशालच्या मागे आई, वडील, बहीण असा परिवार आहे. घटनेची नोंद करवीर पोलिसांत झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com