इंग्रजीतून थेट मराठी शाळेत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गुणवत्तावाढीसाठी राबविलेल्या उपक्रमांचा चांगला परिणाम दिसत आहे. त्यामुळे गुणवत्तेत मराठी माध्यमाचे विद्यार्थी आघाडीवर असतील. 
- सुभाष चौगुले,  शिक्षणाधिकारी प्राथमिक

कोल्हापूर - सध्या इंग्रजी माध्यमाचे फॅड पालकांच्या डोक्‍यात चांगलेच बसले आहे; पण ज्यावेळी आपल्या पाल्याची इंग्रजी माध्यमातील प्रगती पालकांच्या लक्षात येते तेव्हा त्यांना आपल्या मुलाला अगर मुलीला मराठी शाळेमध्ये परत घालण्याशिवाय पर्याय नसतो. अशा मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 

विशेषत: ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक आहे. यावर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने राबविलेल्या अनेक उपक्रमांमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचे शैक्षणिक स्वरूप पालटत असल्यामुळे गावकऱ्यांनाही या शाळा आता आपल्या वाटू लागल्या आहेत. त्यामुळे पटाबरोबर इंग्रजी माध्यमातून जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांची संख्या यावर्षी ६२३ झाली आहे. 

अलीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे समाजातील सर्वच घटकांत आकर्षण आहे. आपला मुलगा इंग्रजी शिकावा, इंग्रजी बोलावा अशी प्रत्येक पालकाची अपेक्षा असते. पण इंग्रजी शाळेत मुलांना घालताना घरातील वातावरणही तसे असावे लागते, हे सुरवातीला पालकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे अशी मुलं मागे पडतात. पूर्व प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत काही अडचणी येत नाहीत, पण नंतर मात्र अडचणी येतात. त्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होतो. त्याला इंग्रजी येत नाही आणि मराठी जमत नाही, अशी त्याची स्थिती होते. तेव्हा पालक आपल्या मुलाला मराठी शाळेत घालण्याचा निर्णय घेतात. हा निर्णय घेत असताना ग्रामीण भागातील पालक जिल्हा परिषदेच्या बदलेल्या शैक्षणिक स्वरूपाला प्राधान्य देत असल्याचे दिसून येते.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून विविध उपक्रम राबवत आहे. त्याचा चांगला परिणाम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्यावर झाला आहे. या उपक्रमाची राज्य पातळीवर दखल घेण्यात आली आणि त्यातील काही उपक्रम संपूर्ण राज्यात सुरू करण्यात आले. अधिकारी, पदाधिकारी बदलले तरी जिल्हा परिषदांच्या शाळांच्या दर्जाकडे मात्र कोणी दुर्लक्ष केलेले नाही. गेल्या दहा वर्षातील एक, दोन अधिकारी वगळता अन्य अधिकाऱ्यांनी योजना कमी-अधिक प्रमाणात, आपल्या कुवतीनुसार राबविल्या. काही अधिकाऱ्यांनी नव्या योजनाही सुरू करण्याचा प्रयत्न केला. यावर्षी तंबाखूमुक्‍त शाळा हा नवीन उपक्रम हाती घेतला आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. या निकषात २००४ शाळांपैकी १४३८ शाळा पहिल्या टप्प्यातच उत्तीर्ण झाल्या.

शालेय वातावरण प्रेरणादायी
चालू वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शालेय गणवेश, ई-लर्निंग सुविधा, रचनावादी शाळा, समाजाचा प्रत्यक्ष सहभाग, शिक्षकांचे वैयक्‍तिक मार्गदर्शन यामुळे शालेय वातावरण प्रेरणादायी ठरत आहे. त्याचाच परिणाम म्हणून ग्रामीण भागातील इंग्रजी माध्यमातील मुलं जिल्हा परिषदेच्या शाळांकडे वळू लागली आहेत. लोकसहभागातून व जिल्हा परिषद स्वनिधीतून साधारणपणे ४४२ डिजिटल शाळांमध्ये ई-लर्निंगच्या माध्यमातून अध्यापन केले जाते. रोटरी क्‍लबने यात मदतीची भूमिका बजावली आहे.

Web Title: english school to direct marathi school