मनोरंजन कार्यक्रमांना परवान्यांची कटकट मिटली

लुमाकांत नलवडे
रविवार, 25 डिसेंबर 2016

कोल्हापूर - हॉटेल, लॉजिंग आणि एक दिवसाच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे परवाने काढण्याची कटकट आता कायमची मिटली आहे.

कोल्हापूर - हॉटेल, लॉजिंग आणि एक दिवसाच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे परवाने काढण्याची कटकट आता कायमची मिटली आहे.

प्रत्येक वर्षी साधारण डिसेंबरमध्ये परवाने नूतणीकरणाची लगबग सरकारी कार्यालयातून सुरू असायची. यंदा मात्र अशी लगबग असणार नाही. थर्टी फस्टच्या कार्यक्रमाची परवानगी घ्यावी लागणार नाही. कारण गृहविभागाच्या आदेशानुसार आता एक दिवसांच्या कार्यक्रमासाठीचे परवानेच कालबाह्य ठरविले आहेत, मात्र जेथे तिकीट घेऊन कार्यक्रम होणार आहे, अशा ठिकाणांना करमणूक कर आदा करावा लागेल. त्यांची परवानी आवश्‍यक असेल.

दरवर्षी हॉटेल, लॉजिंगचे परवाने नूतनीकरण करावे लागत होते. त्यासाठी ठराविक शुल्क आदा करून कागदपत्रे जमा करावी लागत होती. यामध्ये व्यासायिकांची विनाकारण दमछाक होत होती. असे परवाने घेणे अनावश्‍यक असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे होते. यामध्येच एक दिवसांचा कार्यक्रम करणार असला तरीही परवाना घ्यावा लागत होता. त्यामुळे तसेच स्वागत समारंभासाठीही परवानी घ्यावी लागण्याचे आदेश होते. अशा नियमावलीमुळे व्यावसायिकांकडून, सर्वसमान्यांतून नाराजी व्यक्त होत होती.

मुंबई पोलिस अधिनियमाखाली तयार केलेल्या नवीन नियमानुसार हॉटेल व आदरातिथ्य उद्योगासाठी घ्यावयाचे परवाने रद्द केल्यामुळे आता परवाना नूतनीकरणाचीही कटकट मिटली आहे. "परफॉर्मन्स' परवाना देणे कामी तयार केलेली नियमावलीमधील ऑक्रेस्ट्रा, क्‍लासिकल डान्सेस (शास्त्रीय नृत्य), गझल, नाटक, संगीत कार्यक्रम, स्वागत समारंभ, वार्षिक स्नेहसंमेलन, शालेय-महाविद्यालयांचे समारंभ तसेच सहकारी सोसायट्या यांनी आयोजित केलेल्या समारंभांनासुद्धा परवाना घेण्याची गरज भासणार नाही. अर्थात एक दिवसांच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी कोणतीही परवानी घ्यावी लागणार नाही.

बिनधास्त मैफल साजऱ्या करा..
31 डिसेंबरला अनेक ठिकाणी मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. काही हॉटेल्समध्येही कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ऑक्रेस्ट्रा तर सर्रास असतो. संगीत मैफल असतात, असे कार्यक्रम करण्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागत होती; मात्र आता ती परवानगी घ्यावी लागणार नसल्याचे आदेशातून स्पष्ट होते.

31 डिसेंबरची मैफल असो, अथवा इतर कोणताही करमणुकीचा कार्यक्रमाला यापूर्वी परवानगी घ्यावी लागत होती. लॉजिंग किंवा हॉटेल, सोसायट्यांच्या कार्यक्रमांना परवानगी घ्यावी लागणार नाही, मात्र जेथे तिकीट विक्री करून कार्यक्रम होणार आहेत. तेथे करमणूक कर भरूनच परवाना आवश्‍यकच आहे. करमणूक कर आदा करावाच लागेल.
- गणेश शिंदे, जिल्हा करमणूक कर अधिकारी

Web Title: entertainment programme permission