लग्नसराईत पुन्हा उत्साहाला उधाण; कोरोनाच्या भीतीला स्वल्पविराम

सदाशिव पुकळे
Monday, 21 December 2020

सध्या कोरोनाची भीती काही प्रमाणात कमी झाल्याने विवाह मोठ्या धूमधडाक्‍यात साजरे होत आहेत.

झरे (जि. सांगली) : झरे परिसरातील कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे अनेकांची लग्न लांबली होती. तर काहीजणांनी थोडक्‍या खर्चामध्ये थोडक्‍या लोकामध्ये गर्दी न करता अनेकांची लग्न पार पडली आहेत. सध्या कोरोनाची भीती काही प्रमाणात कमी झाल्याने विवाह मोठ्या धूमधडाक्‍यात साजरे होत आहेत. कोरोनाचे आक्रमण मोठ्या प्रमाणात झाल्याने अनेकांचे विवाह थांबले होते. परंतु आता मोठ्या धूमधडाक्‍या मध्ये विवाह सोहळा पार पडत आहेत. त्यामुळे बाजारपेठा फुलल्या आहेत. 

कापड व सराफ पेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे. मंगल कार्यालय सजली आहेत. वाजंत्री मंडपवाले यांनाही भाडे मिळू लागली आहेत. त्यामुळे अनेकांची उपजीविका कशी तरी भागत आहे. गेल्या आठ-दहा महिन्यांमध्ये जीवन कसे जगायचे हा प्रश्न व्यवसाय करणाऱ्याच्या पुढे पडला होता. त्यात थोडीशी सवड मिळाली आहे. 

छायाचित्रकार यांच्यावरही उपासमारीची वेळ आली होती. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन असल्याने छायाचित्रकार यांचे व्यवसाय पूर्णपणे बंद असल्याने उपासमारीची वेळ आली होती. 

अनेक दिवस व्यवसाय बंद असल्याने प्रत्येकाचे प्रिंटरची शाई आळल्याने प्रिंटर खराब झाले होते. अनेक प्रिंटरचे हेड खराब झाले असल्याने प्रिंटर बदलावे लागले. प्रिंटर बदलायचे म्हटले तर कमीत कमी 12 हजार रुपये लागतात, व्यवसायच बंद असल्याने प्रिंटर व इतर साहित्यासाठी पैसे आणायचे तरी कुठून हा गंभीर प्रश्न पडला होता. परंतु सध्या विवाह मोठ्या धूमधडाक्‍यात होत असल्याने प्लीज स्माईलला पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. 

लॉकडाऊनच्या काळामध्ये विवाह झालेलीसुद्धा समजत नव्हते, त्यामुळे छायाचित्रकारांना लग्नाचे कोणतेही भाडे मिळत नव्हते, सध्या अनेक नवीन स्मार्टफोन बाजारात येऊ लागले आहेत. त्यामध्ये चांगल्या प्रतीचे फोटो निघत असल्याने अगोदरच छायाचित्रकारांच्याकडे छोट्या-मोठ्या कार्यक्रमाच्या ऑर्डर मिळत नव्हत्या, त्यामध्ये कोरोनाच्या काळात ऑर्डरी बंद झाल्या होत्या. 

परंतु सध्या पुन्हा एकदा विवाह मोठ्या धूमधडाक्‍यात होऊ लागल्याने छायाचित्रकार, मंडप, डॉल्बी, वाजंत्री, मंगल कार्यालय, घोडेवाले यांना व विवाहसाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी वाढू लागली आहे. 

उपजीविकेपुरत्या ऑर्डरी 
लॉकडाऊनच्या काळामध्ये फोटो व्यवसाय बंद असल्याने अनेकांचे प्रिंटर खराब झाले. अनेक वस्तू पडून राहिल्याने त्यांना सर्विसिंगचा व दुरुस्तीचा खर्च वाढला. सध्या एखादं-दुसरं भाडं येऊ लागलं आहे.. सध्या विवाह सोहळा मोठ्या उत्साहात होऊ लागल्याने छायाचित्रकार, मंडपवाले, मंगल कार्यालय, डॉल्बीवाले, वाजंत्री यांना उपजीविकेपुरती ऑर्डर मिळू लागली आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Enthusiasm again at the wedding; No Corona's fear