उद्योजक हुंडेकरींना पुन्हा धमकी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

शहरातील प्रसिद्ध उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांचे सोमवारी (ता. 18) पहाटे कुख्यात गुन्हेगार अजहर शेख याच्यासह चार जणांनी अपहरण केले होते. त्यांतील दोन आरोपींना पोलिसांनी गजाआड केले; मात्र आज पुन्हा मुख्य आरोपीने करीमभाई यांना मोबाईलवर धमकी दिली. या धमकीने शहरात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, पोलिस दलातर्फे आज हुंडेकरी यांना संरक्षण देण्यात आले. 

नगर : शहरातील प्रसिद्ध उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांचे सोमवारी (ता. 18) पहाटे कुख्यात गुन्हेगार अजहर शेख याच्यासह चार जणांनी अपहरण केले होते. त्यांतील दोन आरोपींना पोलिसांनी गजाआड केले; मात्र आज पुन्हा मुख्य आरोपीने करीमभाई यांना मोबाईलवर धमकी दिली. या धमकीने शहरात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, पोलिस दलातर्फे आज हुंडेकरी यांना संरक्षण देण्यात आले. 

पहाटेच केले अपहरण 
हुंडेकरी उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा करीमभाई रोज एसटी कॉलनीजवळील मशिदीमध्ये पहाटे नमाजपठणासाठी जातात. त्या दिवशी पहाटे नेहमीप्रमाणे ते नमाजपठणासाठी सर्जेपुरा येथील बेलदार गल्लीतून निघाले होते. महापालिकेच्या शाळेजवळून जात असताना पाठीमागून अचानक पांढऱ्या रंगाची एक मोटर आली. त्या मोटारीतून चौघे उतरले. त्यांच्या तोंडाला मास्क बांधलेले होते. त्यांनी हुंडेकरी यांना मोटारीत ओढण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्यांची चांगलीच झटापट झाली. त्या चौघांनी पिस्तुलाचा धाक दाखवून हुंडेकरी यांना मोटारीत बसविले. नंतर औरंगाबाद-पुणे रस्त्यावरून ती मोटार पसार झाली. 

जालन्यात सोडून दिले 
दरम्यान, पोलिसांनी अपहरणाच्या घटनेची तत्काळ दखल घेत सर्वत्र नाकेबंदी करून शोध सुरू केला. 
त्या दिवशी करीमभाई जालना येथे असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्या दृष्टीने त्यांनी शोध सुरू केला. आरोपींनी करीमभाई यांना जालना येथे सोडून पळ काढला. त्यानंतर करीमभाई एसटीने नगरला पोचले. 

पोलिस संरक्षणाची मागणी 
दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी दुसऱ्या दिवशी परतूर येथून दोघांना गजाआड केले. त्यांनी 25 लाख रुपयांसाठी अजहर शेख याच्या सांगण्यावरून अपहरण केल्याची कबुली दिली; मात्र गुन्ह्यातील मुख्य आरोपी अजहर शेख अद्यापि पसार आहे. त्यामुळे करीमभाई यांना पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली होती. 

संरक्षण दिले; कुटुंब धास्तावले 
पोलिस दलाने याची तत्काळ दाखल घेत आज करीमभाई हुंडेकरी यांना पोलिस संरक्षण दिले. त्यांचा अंगरक्षक म्हणून एक शस्त्रधारी पोलिस कॉन्स्टेबल देण्यात आला आहे. दरम्यान, करीमभाई यांना आज मुख्य आरोपीने मोबाईलवरून पुन्हा धमकी दिली. दोन साथीदार अटकेत असतानाही आरोपी पुन्हा धमकी देत असल्याने, पोलिस चक्रावून गेले आहेत. 

अदखलपात्र गुन्हा 
करीमभाई हुंडेकरी यांना आज पुन्हा आरोपीने फोन करून धमकी दिली. याबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
- संदीप मिटके, पोलिस उपअधीक्षक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The entrepreneur threatens again