उद्योजकांचे कोल्हापूरमध्ये आजपासून वीज दरवाढीविरोधात आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

वीज दरवाढीची टांगती तलवार उद्योगावर कायम आहे. म्हणून आज (ता. ७)पासून आठ दिवस उद्योजक व कामगार काळ्या फिती लावून काम करणार आहेत. यावर निर्णय न झाल्यास १४ डिसेंबरला रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती उद्योजकांतर्फे कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष नितीन वाडीकर यांनी दिली.  

कोल्हापूर - उद्योजकांवर वीज दरवाढ सतत लादली आहे, याबाबत आमदार अमल महाडिक व सुरेश हाळवणकर यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन प्रश्‍न मार्गी लावतो, असे आश्‍वासन दिले होते. आजवरही बैठक झाली नाही, परिणामी वीज दरवाढीची टांगती तलवार उद्योगावर कायम आहे. म्हणून आज (ता. ७)पासून आठ दिवस उद्योजक व कामगार काळ्या फिती लावून काम करणार आहेत. यावर निर्णय न झाल्यास १४ डिसेंबरला रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती उद्योजकांतर्फे कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष नितीन वाडीकर यांनी दिली.  

उद्योजक गणेश भांबे म्हणाले, की वीज दरवाढीमुळे उद्योग संकटात आहेत. दोन वर्षांत येथील फाउंड्री उद्योग सावरत आहे. त्यालाही वीज दरवाढीचा फटका बसतोय. वीजबिलांची वसुली कोल्हापूर भागात चांगली आहे. तरीही एखाद्या वेळेस वीजबिल थकले तर तातडीने नोटीस न देता वीजपुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे उद्योजक अडचणीत आल्याने आंदोलनाचे पाऊल उचलावे लागत आहे.

न्यायालयात दाद मागणार 
चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेट्टी म्हणाले, की ‘महावितरण’ने उद्योजक व व्यावसायिकांसाठी केलेली वीज दरवाढ अन्यायकारक आहे. याबाबत अनेकदा मागणी करूनही वीज दरवाढ कमी झालेली नाही, त्यासाठी चेंबर्सतर्फे न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे.

हरिश्‍चंद्र धोत्रे म्हणाले, की केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. मात्र, एका राज्यात वीज स्वस्त व दुसऱ्या राज्यात वीज महाग अशी तफावत दिसते. सर्वत्र विजेचे दर सारखे ठेवण्यात सरकारला अपयश आले आहे.

काशीनाथ जगदाळे म्हणाले, की उद्योजकाला वीज दरवाढ कमी करा म्हणत रस्त्यावर यावे लागते, ही महावितरणची नामुष्की आहे.

लक्ष्मीदास पटेल म्हणाले, की वीज दरवाढीचा प्रश्‍न गेली अनेक वर्षे गाजत आहे, तरीही स्थानिक आमदार यावर उत्तर देत नाहीत, ही गंभीर बाब आहे.

शीतल केतकाळे म्हणाले, की राज्यात ‘जीएसटी’ जसा सारखा आहे, तसा वीजदर सर्वत्र सारखा करावा. अनेकदा वीजबिलात एक ते पाच लाखांचा फरक येतो. त्यामुळे उद्योजकांच्या नुकसानीत वाढ होते. हे सर्व मुद्दे विचारात घेऊन उद्योगांमध्ये आठ दिवस काळ्या फिती लावून कामकाज होईल. यात उद्योजक व कामगार सहभागी होतील, तसेच कारखान्यांवरही काळे झेंडे लावण्यात येतील, असेही राजू पाटील व उद्योजकांनी सांगितले. 

Web Title: Entrepreneurs agitation against0 Hike in Electricity bill