बेळगाव महापालिकेच्या मुख्य कार्यालयात कोरोनाचा शिरकाव ; सात जणांना होम क्वारंटाईनचा सल्ला

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 July 2020

संबंधित कर्मचाऱ्याला ताप आल्यामुळे त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. त्याचा अहवाल शुक्रवारी सायंकाळी पॉजिटीव्ह आला.

बेळगाव - बेळगाव महापालिकेच्या मुख्य कार्यालयातही आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. महापालिकेतील दारीद्र निर्मूलन विभागातील (युपीए सेल) एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे त्या विभागात सेवा बजावणाऱ्या सात कर्मचाऱ्यांना चौदा दिवस होम क्वारंटाईन होण्याचा आदेश आयुक्त के. एच. जगदीश यांनी बजावला आहे.

शुक्रवारी महापालिकेच्या कार्यालयीन कामकाजाची वेळ संपल्यानंतर ही माहिती मिळाली. त्यामुळे शनिवारी सकाळी कार्यालय सीलडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सलग दोन दिवस सुट्टी असल्यामुळे कार्यालयाचे कामकाज बंदच राहणार आहे. पण या दोन दिवसाच्या काळात कार्यालयात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. सोमवारी दारीद्र निर्मूलन विभाग सोडून अन्य विभागांचे कामकाज सुरू केले जाणार आहे. 

गेल्या आठवड्यात पालिकेच्या कोनवाळ गल्लीतील विभागीय कार्यालयातील वॉर्ड क्‍लर्कला कोरोनाची बाधा झाली होती. त्याचा अहवाल आल्यानंतर लगेचच कोनवाळ गल्लीतील विभागीय कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. शिवाय ते कार्यालयही सील डाऊन करण्यात आले होते. त्या कार्यालयातील दहा जणांना चौदा दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. शिवाय महसूल उपायुक्त एस. बी. दोड्डगौडर हेसुद्धा चौदा दिवसांसाठी होम क्वारंटाईन झाले आहेत. त्यानंतर महापालिकेच्या आणखी एका कर्मचाऱ्याचा अहवाल पॉजिटीव्ह आला, त्यामुळे अधिकारी व कर्मचारी धास्तावले होते. मुख्य कार्यालयातील कोणालाही अद्याप कोरोनाची बाधा झाली नव्हती. पण आता मुख्य कार्यालयातील कर्मचाऱ्याला कोरोनाने गाठले आहे. 

संबंधित कर्मचाऱ्याला ताप आल्यामुळे त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. त्याचा अहवाल शुक्रवारी सायंकाळी पॉजिटीव्ह आला. त्याची माहिती आरोग्य विभागाने तातडीने महापालिका प्रशासनाला दिली. त्यानंतर महापालिकेने तातडीने पुढील उपाययोजना सुरू केल्या. 

हे पण वाचा - भर दुपारी सपासप वार करून तरूणाचा खून

बेळगाव शहरात कोरोनाचे रूग्ण वाढल्यामुळे दोन आठवड्यापूर्वी महापालिकेने महत्वाचा निर्णय घेतला होता. महापालिकेत नागरिकांना प्रवेशबंदी केली होती. नागरिकांच्या तक्रारी व अर्ज स्विकारण्यासाठी मुख्य प्रवेशद्वाराजवळ कक्ष सुरू केला होता. तरीही अनेकजण मुख्य कार्यालयात ये-जा करीत होते. त्यामुळे महापालिकेतही कोरोना पोहोचणार अशी चर्चा सुरू होती. ती चर्चा आता खरी ठरली आहे. महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी गेल्या चार महिन्यांपासून कोरोना प्रतिबंधासाठी झटत आहेत. पण त्यांच्याकडून योग्य ती खबरदारी घेतली जात होती. त्यामुळे पालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्याला अद्याप बाधा झाली नव्हती. पण पालिकेचे एकूण तीन कर्मचारी मात्र आता बाधीत झाले आहेत. सर्वात आधी बाधीत झालेला महापालिकेचा वॉर्ड क्‍लर्क बरा होवून घरी परतल्याची माहिती मिळाली आहे. पण त्याच्या संपर्कातील दहा जण अजूनही क्वारंटाईनमध्येच आहेत. आता आणखी सात जण क्वारंटाईन झाले आहेत. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: entry of corona in the head office of Belgaum Municipal Corporation