पाच अवलियांची पर्यावरण सायकल वारी

सुयोग घाटगे 
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

अलिबागच्या पाच अवलियांनी थेट गोवापर्यंतचा प्रवास सुरु केला आहे. तब्बल ५०० किलोमीटर असणाऱ्या या प्रवासामध्ये त्यांनी कोल्हापूरमध्ये विविधस्थळांना भेट दिली.

कोल्हापूर - युवकांमध्ये सायकल चालवण्याविषयी जागृती व्हावी. प्रदूषण नियंत्रणात हातभार लावावा. आरोग्यासाठी व्यायाम करावा यासाठी अलिबागच्या पाच अवलियांनी थेट गोवापर्यंतचा प्रवास सुरु केला आहे. तब्बल ५०० किलोमीटर असणाऱ्या या प्रवासामध्ये त्यांनी कोल्हापूरमध्ये विविधस्थळांना भेट दिली. तसेच जनजागृतीही केली.

सध्या वाढते प्रदूषण आणि पर्यावरणाचा ऱ्हास यामुळे संपूर्ण जग व्यतीत आहे. अशा स्थितीत अलिबाग येथील पाच युवकांनी भारतातील विविध ठिकाणांना सायकल वरून भेट देण्याचा आणि प्रवासादरम्यान जनजागृती करण्याचा चंग बांधला. प्रेम जगदीश पावशे, ऋतिक मंगेश रोगे, स्वरूप प्रभाकर जैतू, केतन नरेश केतकर, निमेष निनाद पावशे अशी या युवकांची नावेआहेत. विविध कार्यक्षेत्रात काम करणारे हे तरुण एकत्र येऊन हा उपक्रम राबवतात. दोन वर्षांपासून या युवकांनी विविध स्थळांना भेटी दिल्या आहेत. साधारण दिवाळी नंतर हे युवक प्रवासाला सुरवात करतात. पर्यटन स्थळांना भेटी देणे आणि तेथील संस्कृती आणि विविधता जाणून घेणे असा प्रकारचा त्यांचा नित्यक्रम आहे.हे युवक प्रति दिवशी १०० ते १२० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करतात.  पर्यावरण वाचवा हा संदेश देताना गाडीचा वापर कमी करा. प्रदूषण कमी करा तसेच वापराचे दुष्परिणामही सांगितले जातात.

सायकलच का?
सायकलवरून प्रवास करताना प्रदूषण होत नाही. फक्त वायू प्रदूषण हा एकच मुद्दा नसून आवाजाचे प्रदूषणही टाळण्यास मदत होते. शिवाय व्यायाम होऊन सुदृढ राहण्यास मदत मिळते म्हणून सायकलवरून प्रवास करण्याचा निर्णय घेतल्याचे हे युवक सांगतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: environment cycle rally