लाचखोर अप्पर लेखापरीक्षकास गडहिंग्लजला अटक

tanaji patil
tanaji patil

गडहिंग्लज : लेखापरीक्षणाचा अहवाल पतसंस्थेच्या बाजूने देण्यासाठी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षाकडून पाच हजाराची लाच स्वीकारताना येथील लेखा परीक्षक  सहकारी संस्था) कार्यालयातील अप्पर लेखापरीक्षक तानाजी दादू पाटील (मूळ रा. अर्दाळ, ता. आजरा, सध्या रा. रामलिंगनगर, गारगोटी रिंगरोड, उत्तूर) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. आज सकाळी पाटील यांच्या कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. 

तक्रारदार हे  'ओम अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी'चे संस्थापक अध्यक्ष आहेत. या संस्थेचे 2016-17 या वर्षाचे ऑडीट करण्याचा ठराव मुख्य लेखापरीक्षकांकडे मुदतीत सादर केलेला नव्हता. यामुळे मुख्य लेखापरीक्षकांनी या संस्थेच्या ऑडीटसाठी येथील अप्पर लेखापरीक्षक श्री.पाटील यांची नेमणूक केली. 1 नोव्हेंबर रोजी संबंधित संस्थेच्या अध्यक्षांनी संस्थेचे सर्व दफ्तर घेवून पाटील याची कार्यालयात भेट घेतली. हे दफ्तर तपासून संस्थेला सहाय्य होईल, संस्थेचा कारभार यापुढेही चालू राहील यादृष्टीने अहवाल तयार करून मुख्य लेखापरीक्षकांकडे सादर करण्यासाठी दहा हजाराची मागणी केली. हे पैसे न दिल्यास संस्थेच्या विरोधात अहवाल देऊन संस्थेचा परवाना कसा रद्द होईल याचे नियोजन करेल, संस्थेच्या कामकाजाची खोटी कागदपत्रे दिली म्हणून अध्यक्षांविरूद्ध गुन्हा दाखल करू, सर्व संचालकांना नोटीसा पाठवू आणि संस्था दिवाळखोरीत काढण्याचा अहवाल मुख्य लेखापरीक्षकांकडे पाठविण्याची भिती घातली. यामुळे तक्रारदाराने 6 नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पाटील याच्याविरूद्ध तक्रार केली होती. 8 नोव्हेंबर रोजीच्या फेर पडताळणीत संस्थेच्या बाजूने अहवाल देण्यासाठी तडजोडीअंती पाच हजार रूपये देण्यावर शिक्कामोर्तब झाला होता. त्यानुसार आज श्री. पाटील याने संस्थाध्यक्षाला पैसे घेऊन कार्यालयात येण्यास सांगितले होते.

दरम्यान, कोल्हापूरचे पोलिस निरीक्षक प्रविण पाटील, सहायक फौजदार शामसुंदर बुचडे, पोलिस नाईक शरद पोरे, संदीप पावलेकर, चालक विष्णू गुरव यांच्या पथकाने सापळा रचला होता. यावेळी पाच हजार रूपये स्वीकारताना पाटील यास रंगेहाथ अटक करण्यात आली. उपायुक्त संदीप दिवाण, कोल्हापूरचे पोलिस उपअधीक्षक गिरीष गोडे यांच्या मार्गदर्शनाने ही कारवाई करण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com