मंगळवेढा : तालुक्यातील ग्रामपंचायती ऑनलाईन जोडण्याचे काम रखडले

हुकूम मुलाणी
रविवार, 25 फेब्रुवारी 2018

ग्रामपंचायती ब्रॉडबॅन्डने जोडण्याची स्वतंत्र जबाबदारी एल अ‍ॅन्ड टी कंपनीकडे असून हे काम संथ गतीने सुरु आहे. रखडलेले काम वेळेत पुर्ण करणेसाठी पत्रव्यवहार केला आहे. शिवाय वरिष्ठानाही याबाबत कळविले आहे
फ्रकु्रदीन शेख (अभियंता बी.एस.एन.एल.)

मंगळवेढा : तालुक्यातील ग्रामपंचायती ऑनलाईन जोडण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून रखडले असल्याने विविध प्रकारचे ऑनलाईन दाखले देण्यास अडचणीचे ठरत आहे परिणामी ग्रामपंचायतीचे आर्थिक उत्पन्न बुडत असून यासाठीचा भार दुष्काळी तालुक्यातील ग्रामपंचायतीला सोसावा लागत आहे.

सध्या विविध शासकीय कार्यालयाचे कामकाज संगणकीकृत झाले असून या कार्यालयाच्या माध्यमातून मिळणाऱ्या सुविधा देखील ऑनलाईन झाल्या आहेत. ग्रामपंचायतीमध्ये कॉमन सर्व्हीस सेंटरच्या माध्यमातुन विविध प्रकारचे 33 दाखले ऑनलाईन देण्याची सुविधा तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध करुन दिली. यासाठी संगणक,प्रिंटर,वेब कॅमेरा व ऑपरेटरची सुविधा उपलब्ध करुन दिली. ऑपरटेरच्या वेतनापोटी व अन्य खर्चापोटी ग्रामपंचायतीकडून दरमहा रक्कम अगोदरच भरुन घेतली. बी.एस.एन.एल प्रत्येक ग्रामपंचायती ब्रॉडबॅन्डने जोडण्यासाठी स्वतंत्र लाईन व कनेक्शन ग्रामपंचायतीला देण्यासाठी शासनाने स्वतंत्र तरतुद केली. या कंपनीने प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सेटअप बॉक्स बसविले देखील पण कनेक्शन मात्र अदयापही सुरु केले नाही. त्यामुळे शासनाच्या विविध योजनेची माहिती ग्रामस्थांना देणे व योजनेतील माहिती ऑनलाईन भरणेसाठी इंटरनेट सुविधा असणे आवश्यक आहे पण दाखले व ग्रामपंचायतीच्या कारभाराच्या नोंदी करणे इंटरनेट अभावी अडचणीचे ठरत आहे. नोंदीसाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते शिवाय सध्या देण्यात येणारे दाखले ऑफलाईन असल्यामुळे या दाखल्यापोटी मिळणारे आर्थिक उत्पन्न बुडत आहे. बी.एस.एन.एलने तात्काळ इंटरनेट सुविधा सुरु करावी अशी मागणी होत आहे.

ग्रामपंचायती ब्रॉडबॅन्डने जोडण्याची स्वतंत्र जबाबदारी एल अ‍ॅन्ड टी कंपनीकडे असून हे काम संथ गतीने सुरु आहे. रखडलेले काम वेळेत पुर्ण करणेसाठी पत्रव्यवहार केला आहे. शिवाय वरिष्ठानाही याबाबत कळविले आहे
- फ्रकु्रदीन शेख (अभियंता बी.एस.एन.एल.)

दोन वर्षापुर्वी सेट बॉक्स बसविला पण कनेक्शन अदयापही सुरु केले नाही ऑनलाईन दाखले देता येत नाहीत त्यामुळे ग्रामपंचायतीचे आर्थिक उत्पन्न बुडत असून कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा भारही ग्रामपंचायतीवर पडत आहे.
- आश्‍विनी सोनगे (सरपंच,सिध्दापूर)

Web Title: esakal marathi news mangalwedha internet connection grampanchayat