सहायक फौजदार दिलीपकुमार सवाणे यांना राष्ट्रपतिपदक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

सहायक फौजदार सवाणे सध्या जिल्हा विशेष शाखेत कार्यरत असून बुधवारी करमाळा पोलिस ठाण्यात तपासणीच्या निमित्ताने गेल्यानंतर त्यांना पत्रकारांनी फोन केल्यावर आनंदाची बातमी समजली. 1983 मध्ये ते पोलिस शिपाई म्हणून पोलिस दलात दाखल झाले. गेल्या 35 वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत असून आजवर त्यांना 368 रिवॉर्ड मिळाले आहेत.

सोलापूर : ऑनड्यूटी 24 तास दक्ष राहावे लागणाऱ्या पोलिसदलात गेल्या 35 वर्षांपासून वरिष्ठांनी दिलेले काम वेळेआधी आणि चोखपणे बजाविणारे सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील सहायक फौजदार दिलीपकुमार बब्रुवान सवाणे यांना बुधवारी राष्ट्रपतिपदक जाहीर झाले. आजवरच्या प्रामाणिक कामाची दखल घेतल्याची भावना कामाच्या निमित्ताने परगावी असलेल्या सवाणे यांनी व्यक्त केली. 

सहायक फौजदार सवाणे सध्या जिल्हा विशेष शाखेत कार्यरत असून बुधवारी करमाळा पोलिस ठाण्यात तपासणीच्या निमित्ताने गेल्यानंतर त्यांना पत्रकारांनी फोन केल्यावर आनंदाची बातमी समजली. 1983 मध्ये ते पोलिस शिपाई म्हणून पोलिस दलात दाखल झाले. गेल्या 35 वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत असून आजवर त्यांना 368 रिवॉर्ड मिळाले आहेत. एनडीपीएस कायद्यानुसार अकलूजमध्ये करण्यात आलेल्या कारवाईबद्दल 2015 मध्ये त्यांना पोलिस महासंचालकांकडून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले होते. आजवर त्यांनी सोलापूर तालुका पोलिस ठाणे, अकलूज पोलिस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा, विशेष शाखा आदी ठिकाणी जबाबदारी सांभाळली आहे. राष्ट्रपतिपदक जाहीर झाल्यानंतर पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी सहायक फौजदार सवाणे यांचे अभिनंदन केले आहे. 

सवाणे यांचे वडील बब्रुवान सवाणे हे जिल्हा परिषद शाळेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. पत्नी सुरेखा या गृहिणी असून मुलगा अनिकेत पुण्यात कंपनीत इंजिनिअर आहे, तर मुलगी अनघा ही नांदेड येथे जिल्हा परिषद शिक्षिका आहे. आजवरच्या प्रामाणिक सेवेची दखल शासनाने घेतल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. बुधवारी रात्री सवाणे हे विशेष शाखेच्या पथकासह करमाळ्यात होते. सहायक पोलिस निरीक्षक संभाजी काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. 

मोबाईल नाही वापरत... 
सहायक फौजदार दिलीपकुमार सवाणे हे मोबाईल वापरत नाहीत. मोबाईल फोनमुळे कामावर परिणाम होतो असे त्यांचे म्हणणे आहे. जर चुकून कोणाचा फोन घेतला नाही, तर कारण नसताना गैरसमज निर्माण होतो. मोबाईल नसल्यामुळे संपर्क झाला नाही किंवा या कारणावरून वरिष्ठांनी त्यांना ओरडल्याची घटना घडली नसल्याचे त्यांनी सांगितले. दिलेले काम वेळेआधी आणि चोखपणे केल्यास अडचणी येत नाहीत. 10 वाजता ड्यूटी असेल तर मी नऊ वाजताच पोचतो. जर महत्त्वाचा काही निरोप असेल तर घरातील किंवा कार्यालयातील फोनवरून संवाद होतो. माझ्याकडे मोबाईल नाही म्हणून कधीच अडचणी आल्या नाहीत, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

Web Title: esakal marathi news President's Police Medal solapur