मुख्यमंत्री जमिनीवर मंत्री मात्र 'हवे'तच 

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

सोलापूर : महापालिकेतील कारभारावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री विजय देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख या दोघांनाही धारेवर धरले. 'एकत्र या आणि सोलापूरचा विकास करा' असा सल्ला देतानाच आपण पक्षामुळे आहोत, पक्ष आपल्यामुळे नाही याची जाणीव ठेवा हे सांगण्यास ते विसरले नाहीत.

सोलापूर : महापालिकेतील कारभारावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री विजय देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख या दोघांनाही धारेवर धरले. 'एकत्र या आणि सोलापूरचा विकास करा' असा सल्ला देतानाच आपण पक्षामुळे आहोत, पक्ष आपल्यामुळे नाही याची जाणीव ठेवा हे सांगण्यास ते विसरले नाहीत.

सोलापुरातल्या दोन्ही मंत्र्यांमधील वाद संपेल आणि विकासकामांना सुरवात होईल, या आशेवर असलेल्या शहरवासियांची घोर निराशा झाली. ती भाजपच्या नगरसेवकांतूनही व्यक्त होऊ लागली. त्यामुळे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच गांभीर्याने दखल घेतली. मंत्री, पदाधिकारी आणि सर्व नगरसेवकांना मुंबईत बोलावून सर्वांचीच कानउघडणी केली. मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्याप्रमाणे मंत्री आणि त्यांच्या समर्थकांना पक्षाचे महत्त्व कळेल. पक्षाचे महत्त्व सांगून श्री. फडणवीस यांनी ते 'जमिनीवर' असल्याचे दाखवून दिले आहे, तर दोन्ही मंत्री मात्र अजूनही "हवेत'च असल्याचे दिसून येत आहे. 

काल मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत पक्षीय हितापेक्षा वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांवर भर होता. त्यांचे काय चुकले आणि आम्ही किती बरोबर आहोत हे सांगण्यातच दोन्ही गटाचे नगरसेवक अग्रभागी होते. अखेर मुख्यमंत्र्यांनीच त्यात हस्तक्षेप केला आणि "तुम्ही असेच वागत असाल तर महापालिकाच बरखास्त करण्याशिवाय पर्याय नाही' असे सांगितले. महापालिकेतील गटबाजीचे स्वरूप पाहिल्यावर मुख्यमंत्र्यांनाही निश्‍चित धक्का बसला. त्यामुळेच "आपण भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे पदावर आहोत. त्यामुळे कुणीही स्वतःला फार मोठे समजू नये. पक्षात कोणीही 'मालक' नाही. माझे पद काढून घेतले तर मीही शून्य आहे' असा उल्लेख त्यांनी जाणीवपूर्वक केला.

गेल्या वर्षभरापासून गटबाजीचे राजकारण सुरू आहे. या संदर्भात दोन्ही मंत्र्यांना छेडले की त्यांच्याकडून 'आमचा काही संबंध नाही' असे उत्तर मिळायचे. बैठकीतील चर्चेनंतर गटबाजीने किती उग्र स्वरूप घेतले आहे, याचेच प्रत्यंतर मुख्यमंत्र्यांसह उपस्थित पदाधिकाऱ्यांना झाले. त्यांनी या सर्वच प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन, संघटनात्मक पातळीवर तसेच महापालिकेच्या पातळीवर नियोजन करण्याचे संकेत दिले. 'माझ्यामुळे महापालिकेत पक्ष आहे' असा दावा करणारे आपोआपच जमिनीवर येणार आहेत.

Web Title: esakal marathi news solapur devendra fadanvis news