'सोलापूरचा पॅडमॅन'; हजारो विद्यार्थिंनींपर्यंत पोचविले सॅनिटरी नॅपकिन! 

परशुराम कोकणे
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

आजच्या घडीला सॅनिटरी नॅपकिन ही मूलभूत गरज झाली आहे. आपण स्वतःला फार ऍडव्हान्स आणि फॉरवर्ड समजतो पण या बाबतीत उदासीनता दाखवतो. पॅडमॅन चित्रपटाच्या निमित्ताने या विषयावर आज उघडपणे चर्चा होतेय ही चांगली गोष्ट आहे. आजवर राज्यभरातील हजारो विद्यार्थिनींपर्यंत नॅपकिन पोचविल्याचे समाधान आहे. 
- भाऊराव भोसले, 
सॅनिटरी नॅपकिन व्हेंडींग मशिन वितरक

सोलापूर : नैसर्गिक प्रक्रिया असलेल्या मासिक पाळीच्या विषयावर आजही उघडपणे बोलले जात नाही. काही घरांमध्ये तर टीव्हीवर नॅपकीनची जाहिरात लागली की चॅनेल बदलले जाते. आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या सॅनिटरी नॅपकीनअभावी शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थिनींची गैरसोय होऊ नये, त्यांना सहजपणे नॅपकिन मिळाव्यात यासाठी सोलापूरचे भाऊराव भोसले कार्यरत आहेत. त्यांनी सोलापूरचा पॅडमॅन म्हणून ओळख निर्माण केली आहे. 

सॅनिटरी नॅपकिनच्या विषयावर आधारित असलेला अक्षयकुमार आणि राधिका आपटेचा पॅडमॅन चित्रपट आज(शुक्रवारी) प्रदर्शित होतोय. याच निमित्ताने सॅनिटरी नॅपकिन आणि व्हेडींग मशिनच्या क्षेत्रात काम करणाऱ्या भाऊराव भोसले यांच्याशी "सकाळ'ने संवाद साधला. भाऊराव यांनी पाच वर्षांपूर्वी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचा व्यवसाय सोडून शाळा, महाविद्यालयांमधून सॅनिटरी नॅपकिन सहज उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले. पाच रुपयांची क्वाईन टाकल्यावर एखादी वस्तू मशीनमधून बाहेर येते, हे तुम्ही पाहिले असेल. अशाच प्रकारचे क्वॉईन टाकल्यावर सॅनिटरी नॅपकिन बाहेर येणारी मशिन भाऊराव यांनी बनविली. यासाठी लागणारे पार्टस त्यांनी आंध्रप्रदेशातून आणले. 

सॅनिटरी नॅपकीनची गरज, व्हेंडींग मशीनमुळे होणारी सोय याबाबतची माहिती देण्यासाठी भाऊराव नागपूरपासून सावंतवाडीपर्यंत अनेक ठिकाणी फिरले. काही शाळा, महाविद्यालयांमध्ये त्यांनी उदासीनतेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्यांनी हार न मानता आपली धडपड चालू ठेवली. आजवर त्यांनी शेकडो शाळा, महाविद्यालयांमध्ये ही मशिन बसविली आहे. सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून दिल्या. वापरलेल्या नॅपकिन कचऱ्यात न टाकता त्या जाळण्यासाठीही मशिनही उपलब्ध केली आहे. 

एका सर्व्हेनुसार असे लक्षात आले की मासिक पाळीच्या काळातील गैरसोयीमुळे अनेक मुली वर्षातले 50 दिवस शाळेलाच जात नाहीत. आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या असणाऱ्या या विषयावर शासनानेही लक्ष घातले आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडीग मशिन बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Web Title: esakal marathi news solapur padman news