कलेसाठी गुण दिले; पण शिकविणार कोण ? 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

"कलाविषयांना शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांची अडचण होत आहे. त्यामुळे प्रत्येक माध्यमिक शाळेत कलाशिक्षक नेमावा, आठवड्याला चार तासिका ठेवाव्यात, पहिली ते आठवीसाठी कलाशिक्षकांची नेमणूक करावी या मागण्यांसाठी पाठपुरावा सुरू आहे.'' 
- एकनाथ कुंभार (विभागीय उपाध्यक्ष) 
महाराष्ट्र राज्य कलाध्यापक महामंडळ 

गडहिंग्लज : शैक्षणिक जीवनात दहावीचे वर्ष महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांत एका-एका गुणासाठी चढाओढ असते. अशा परिस्थितीत शासनाने दहावी परीक्षेत कला विषयासाठी तब्बल 15 गुणांची तरतूद केली आहे. मात्र, माध्यमिक शाळांमध्ये हा विषय शिकविण्यासाठी कलाशिक्षकच नाहीत. बहुतांश शाळा कलाशिक्षकांविनाच आहेत. त्यामुळे परीक्षेसाठी गुण दिले; पण कला विषय शिकविणार कोण? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी अडचण होत आहे. 
शासनाने चार वर्षांपासून शिक्षकभरतीवर बंदी आणली आहे. त्यामुळे अनेक माध्यमिक शाळांतील कलाशिक्षकांच्या जागा रिक्तच आहेत. असे असले तरी दहावी परीक्षेत विद्यार्थ्यांसाठी 15 गुणांची तरतूद केली आहे. इंटरमिजिएट ही शासकीय ग्रेड परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्यांना या गुणांचा लाभ मिळू शकतो. "ए' ग्रेडमध्ये उत्तीर्ण असणाऱ्यांना 15, "बी' ग्रेडसाठी 10, तर "सी' ग्रेडसाठी 5 गुणांची तरतूद आहे. इतके भरभक्कम गुण मिळत असले, तरी या विषयाची तयारी करून घेण्यासाठी शाळांमध्ये कलाशिक्षक आहेत का? या प्रश्‍नाचे उत्तर मात्र नकारार्थी येते. परिणामी, कलाशिक्षकांविना विद्यार्थ्यांची मोठी अडचण होत आहे. 

याउलट जिल्हा परिषदेच्या शाळांत कला, कार्यानुभव व संगीत विषयासाठी अतिथी निदेशक पद तयार केले आहे. पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळांत कंत्राटी पद्धतीने या पदावर शिक्षकांची नियुक्ती केली जात आहे. त्यामुळे प्राथमिक शाळांना कंत्राटी का असेना, कलाशिक्षक मिळत आहेत. मात्र, माध्यमिक शाळांतील कलाशिक्षकांच्या जागा भरण्याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. मोठ्या शाळांमध्ये तुलनेत परिस्थिती बरी आहे. कारण, या शाळांत एकापेक्षा अधिक कलाशिक्षक कार्यरत होते. एखादा शिक्षक निवृत्त झाल्यानंतर किमान अन्य शिक्षक तरी त्या ठिकाणी कार्यरत आहे. मात्र, छोट्या शाळांची अवस्था अधिकच बिकट आहे. या शाळांत एखादाच शिक्षक कार्यरत होता. तोही शिक्षक निवृत्त झाल्यानंतर या शाळा कलाशिक्षकाविनाच आहेत. इतर शिक्षकांकडे या विषयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र, संबंधित शिक्षकाला कला विषयाचे संपूर्ण ज्ञान असेलच असे नाही. त्यामुळे शिकविताना त्यांनाही मर्यादा येत आहेत. परिणामी, विद्यार्थ्यांची अडचण होत आहे. 

तासिकाही केल्या कमी... 
एका वर्गाला आठवड्याला कला विषयाच्या चार तासिकांची तरतूद होती. यंदा शिक्षण विभागाने यांतील दोन तासिका कमी करण्याचा निर्णय घेतला. त्याला कलाध्यापक महामंडळाने तीव्र विरोध केला. त्यानंतर एक तासिका वाढवून देण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. 
 

Web Title: esakal news kolhapur news