मंडणगडमध्ये नागरिकांचे आरोग्य वाऱ्यावर 

सचिन माळी
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

तालुक्‍यातील आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात नागरिकांना अपेक्षित आरोग्य सेवा मिळत नाही. अपुऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे इतरांवर कामाचा ताण वाढल्याने अत्यावश्‍यक वेळी रुग्णांना चांगली वागणूक मिळत नाही. 
- रघुनाथ पोस्टुरे, नागरिक 

मंडणगड : तालुक्‍यातील देव्हारे, पंदेरी प्राथमिक आरोग्य केंद्रेच आजारी पडली आहेत. तालुका ग्रामीण रुग्णालय सध्या व्हेंटिलेटरवर गेले आहे. यामुळे तालुक्‍यातील नागरिकांचे आरोग्यच वाऱ्यावर आहे. तालुक्‍यात देव्हारे प्राथमिक आरोग्य केंद्राला परिसरातील 34 गावे जोडली आहेत. पंदेरी आरोग्य केंद्राला 43 गावांतील लोकांना आरोग्य सुविधा पुरविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. 

तालुक्‍यातील आरोग्य विभागाचे आरोग्यच बिघडलेले आहे. 137 मंजूर पदे असून वैद्यकीय अधीक्षक, अधिकाऱ्यांसह विविध 39 पदे रिक्त आहेत. ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सेवा नेहमीच चिंतेचा विषय आहेत. मोठा अपघात झाल्यास अथवा गंभीर आजार उद्‌भवल्यास येथे प्रथमोपचाराची सोयही उपलब्ध नाही. साथीचे आजार, ताप, मलेरिया व किरकोळ अपघात झाल्यास प्रथमोपचारापर्यंतच येथे मर्यादित सोय होते. तालुक्‍यात कुंबळे, पणदेरी व देव्हारे या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनाची सोय उपलब्ध नाही. अत्याधुनिक यंत्रसामग्री, तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, विविध आजारांवरील तपासणी कक्ष येथे उपलब्ध करणे अत्यावश्‍यक आहे. देव्हारे व पणदेरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्यात येत नाहीत. कर्मचारी मुख्यालयात राहत नाहीत. यामुळे देव्हारे व पंदेरीअंतर्गत 77 गावांतील लोकांना आरोग्य सुविधाच मिळत नाहीत. रुग्णांचे हाल होत असताना रुग्ण कल्याण समिती, स्थानिक लोकप्रतिनिधी यांची याकडे डोळेझाक होत आहे. एक ग्रामीण रुग्णालय व एक पंदेरी आरोग्य केंद्राची इमारत बांधून त्याचा अजूनही वापर सुरू नाही. करोडो रुपये खर्च करून रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम सुरू आहे; परंतु वैद्यकीय सेवेचा बोजवाराच उडालेला आहे. 

- पणदेरी प्राथमिक आरोग्य केंद्र 
मंजूर पदे-35, रिक्त पदे-13, वैद्यकीय अधिकारी 2, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 1, कृष्ठरोग तंत्रज्ञ 1, आरोग्य सेवक पुरुष 4, महिला 1, पुरुष परिचर 2, अंशकालीन स्त्री परिचर 1, सफाई कामगार 1 या पदांचा समावेश आहे. 

- देव्हारे प्राथमिक आरोग्य केंद्र 
एकूण 40 पदे मंजूर असून 11 पदे रिक्त आहेत. त्यात वैद्यकीय अधिकारी 2, आरोग्य सेवक पुरुष 4, महिला 2, पुरुष परिचर 1, अंशकालीन स्त्री परिचर 2 या पदांचा समावेश आहे. 

- ग्रामीण रुग्णालय मंडणगड 
मंजूर पदे-26, रिक्त पदे-10, वैद्यकीय अधीक्षक-1, वैद्यकीय अधिकारी-2, कार्यालयीन अधीक्षक-1, कनिष्ठ लिपिक-2, कक्ष सेवक-2, लॅब टेक्‍निशियन-1, एक्‍स रे टेक्‍निशियन-1. 

- कुंबळे प्राथमिक आरोग्य केंद्र 
मंजूर पदे-36, रिक्त पदे-5, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 1, आरोग्य सेवक पुरुष 1, पुरुष परिचर 1, अंशकालीन परिचर 1, सफाई कामगार 1 या पदांचा समावेश आहे. 

Web Title: esakal news mandangad news

टॅग्स