नांदवडेत जीबी सिंड्रोमने दोघांचा मृत्यू 

जोतिबा मोरे, रमेश सुतार
रविवार, 9 जुलै 2017

नांदवडे (ता. चंदगड) येथे जीबी सिंड्रोम आजाराने एकाच दिवशी दोघांचा मृत्यू झाला. जोतिबा गुंडू मोरे (वय 50) व रमेश कृष्णा सुतार (35) अशी त्यांची नावे आहेत. आजारी पडल्यापासून काही दिवसांत दोघांचा मृत्यू झाल्याने हा साथीचा रोग असावा, या संशयाने गावात भीतीचे वातावरण आहे.

चंदगड- नांदवडे (ता. चंदगड) येथे जीबी सिंड्रोम आजाराने एकाच दिवशी दोघांचा मृत्यू झाला. जोतिबा गुंडू मोरे (वय 50) व रमेश कृष्णा सुतार (35) अशी त्यांची नावे आहेत. आजारी पडल्यापासून काही दिवसांत दोघांचा मृत्यू झाल्याने हा साथीचा रोग असावा, या संशयाने गावात भीतीचे वातावरण आहे. आरोग्य विभागाने याची दखल घेऊन गावात हेरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथक तैनात केले आहे. 

मोरे यांच्यावर केएलईमध्ये उपचार सुरू होते. त्यानंतर बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविले. आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा अंत्यविधी सुरू असताना रमेश सुतार यांचा कोल्हापुरातील रुग्णालयात मृत्यू झाला. रमेशवर सुरवातीला गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात त्यांना हलविले. त्यांचाही आज मृत्यू झाला. 
एकाच आजाराने दोघांचा मृत्यू झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली. त्याचबरोबर हा साथीचा आजार असावा, या संशयाने भीतीचे वातावरण आहे. माजी सरपंच ऍड. संतोष मळवीकर, जयवंत पेडणेकर आदींनी आरोग्य विभागाशी संपर्क साधला. हेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी चैताली कांबळे, विस्तार अधिकारी ए. पी. गजगेश्‍वर, जे. एस. बोकडे यांच्यासह पथकाने भेट दिली. 

दरम्यान, आरोग्य विभागाने बेळगाव सिव्हिल हॉस्पिटल, कोल्हापुरातील खासगी हॉस्पिटलशी संपर्क साधला असता या दोघांचाही मृत्यू जीबी सिंड्रोम आजाराने झाल्याचे वैद्यकीय अहवालाच्या आधारे स्पष्ट केले. रमेश माजी सरपंच कृष्णा सुतार यांचा मुलगा असून, तो पोस्टमन होता. त्याच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे, तर मृत मोरे शेतकरी होते. त्यांच्या मागे पत्नी व पाच मुली असा परिवार आहे. 

हा साथ रोग नव्हे... 
जीबी सिंड्रोम हा संसर्गजन्य रोग नाही. मधुमेह, रक्तदाब यांसारखाच तो रोग आहे. तो श्‍वसन संस्था आणि मेंदूशी निगडित आहे. नांदवडे येथील दोघांचा याच रोगाने मृत्यू होणे हा योगायोग असू शकतो. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. 

योगायोग... 
गतवर्षी नांदवडेतील याच गल्लीतील अर्जुन गावडे यांचा जीबी सिंड्रोमने मृत्यू झाला होता. यावर्षी आणखी दोघांचा याच आजाराने मृत्यू झाला. या योगायोगाची गावात चर्चा होती. 
 

Web Title: esakal news sakal news death of two