दुचाकी चोरणाऱ्या दोघा भावांना पकडले !

हरिभाऊ दिघे
मंगळवार, 25 जुलै 2017

संगमनेर शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात दुचाकींच्या चोरीचे प्रमाण वाढले होते. दुचाकी चोर जेरबंद करणे पोलिसांना आव्हान ठरले होते. दरम्यान दोन दुचाकी चोरांना पकडण्यात संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाला यश आले.

तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने दुचाकींच्या चोरीच्या गुन्ह्यात पेमगिरी ( ता. संगमनेर ) येथील दोघा भावांना अटक केली. त्यांच्याकडून एक लाख रुपये किंमतीच्या दोन दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या.

संगमनेर शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात दुचाकींच्या चोरीचे प्रमाण वाढले होते. दुचाकी चोर जेरबंद करणे पोलिसांना आव्हान ठरले होते. दरम्यान दोन दुचाकी चोरांना पकडण्यात संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाला यश आले. संगमनेर शहरातील ऐश्वर्या पेट्रोलपंपाच्या पाठीमागील परिसरात राहणाऱ्या वैभव सुभाष पांडे यांच्या मालकीची पल्सर दुचाकी वेदांत कॉम्प्लेक्स पार्किंगमधून चोरीला गेली होती. पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांना सदर दुचाकी पेमगिरी ( ता. संगमनेर ) येथील रमेश रंगनाथ गुरकुले याच्याकडे असल्याचे समजले. त्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेचे हे. कॉ. ईस्माईल शेख, बाळासाहेब अहिरे, रमेश लबडे, गोरक्ष शेरकर, रघुनाथ खेडकर यांच्या पोलीस पथकाने पेमगिरी येथे जावून रमेश गुरकुले व संदीप गुरकुले या दोघा भावांना सापळा लावून राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन चोरीच्या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. दोघा आरोपींविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संगमनेर न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दोघे आरोपी पकडल्याने दुचाकी चोरीच्या टोळीचा छडा लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ. रघुनाथ खेडकर अधिक तपास करीत आहेत. 

Web Title: esakal news sakal news sangamner news