संगमनेर येथे मालपाणी फार्मचे 'वृक्षदान' अभियान ; एक लाख वृक्षरोपांचे निःशुल्क वितरण

हरिभाऊ दिघे
बुधवार, 12 जुलै 2017

पर्यावरण संतुलन राखण्यास मोलाचा हातभार लावण्याच्या दृष्टीने मालपाणी फार्मतर्फे मागील वर्षाप्रमाणे यंदाही एक लाख वृक्षरोपांचे निःशुल्क वितरण केले जाणार असून या 'वृक्षदान' अभियानाचा प्रारंभ झाल्याची माहिती, मालपाणी फार्मच्या संचालिका सौ. रचना मालपाणी यांनी दिली. 

तळेगाव दिघे ( जि. नगर ) : संगमनेर येथील मालपाणी उद्योग समूहाने सामाजिक बांधिलकीच्या 'वृक्षदान' अभियान सुरु केले आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही एक लाख वृक्ष रोपांचे निःशुल्क वितरण केले जाणार असून या 'वृक्षदान' अभियानास प्रारंभ करण्यात आला आहे.

मोठ्या प्रमाणावरील लोकसहभागामुळे मागील वर्षी 'वृक्षदान' अभियान यशस्वी झाले होते. त्यामुळे यावर्षीही मालपाणी क्लबच्या जवळच कासारवाडी रस्त्यावर असलेल्या मालपाणी फार्मच्या नर्सरीमध्ये 21 प्रकारची वृक्ष रोपे तयार करण्यात आली आहेत. त्यात अर्जुन, बेहडा, वारस, कोर्डीया, टेटू, मारखामिया, गुलाबी टाबुबिया, टिकोमा गौडीचौडी, तामण, कडुलिंब, जांभूळ, शिवण, पिंपळ, रानभेंडी, सप्तपर्णी, बिक्सा, आपटा, टिकोमा, कर्मळ, रोहितक, रिठा अशा विविध प्रकारच्या फळझाडांचा, फुलझाडांचा आणि औषधी वृक्षांचा समावेश आहे.

या रोपांची लागवड घराच्या आवारात, शाळा, सोसायटी परिसर, रस्त्यांच्या दुतर्फा, देवालयाच्या आवारात, डोंगरांवर, मैदानांच्या कडेला करून वृक्षसंवर्धन करू शकता. वृक्षारोपण करून संगमनेर हिरवेगार करण्यासाठी सर्वांनीच पुढे यावे, कारण एकेक वृक्ष आपणास असंख्य लाभ मिळवून देतो. वातावरणात प्राणवायूचे पुरेसे प्रमाण राखण्यास मदत करणे तसेच बहुगुणी औषधांच्या रूपाने उपयुक्त ठरणारे वृक्ष हे मानवाच्या दृष्टीने 'किमयागार' आहेत. यासाठी 'वृक्षदान' मोहीम सर्वांनी आपली मोहीम समजून वृक्षारोपण करून यशस्वी करावी, असे आवाहन सौ. रचना मालपाणी यांनी केले आहे. वृक्षप्रेमी व्यक्ती व संस्थानी रोपांसाठी मालपाणी हेल्थ क्लबच्या शेजारी असलेल्या मालपाणी फार्म येथे नरेश दासरी ( मोबाईल : 90110 29340 ) यांच्याशी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या कालावधीत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

पर्यावरण संतुलन राखण्यास मोलाचा हातभार लावण्याच्या दृष्टीने मालपाणी फार्मतर्फे मागील वर्षाप्रमाणे यंदाही एक लाख वृक्षरोपांचे निःशुल्क वितरण केले जाणार असून या 'वृक्षदान' अभियानाचा प्रारंभ झाल्याची माहिती, मालपाणी फार्मच्या संचालिका सौ. रचना मालपाणी यांनी दिली. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: esakal news sangamner news afforestation news