सोलापूरच्या ब्रॅडींगसाठी सोलापूर सोशल फाउंडेशनची स्थापना 

प्रमोद बोडके
शुक्रवार, 11 मे 2018

सोलापूरच्या विकासात हे फाउंडेशन महत्त्वाची भूमिका बजावले अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिली. 

सोलापूर - सोलापूर शहर व जिल्ह्याला राज्यात आणि देशात ओळख मिळावी यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यासाठी सोलापूर सोशल फाउंडेशनची निर्मिती करण्यात आली आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून सोलापूरच्या बाहेर सोलापुरी उत्पादनांना मार्केट देण्याचा प्रयत्न राहील, सोलापूरच्या विकासात हे फाउंडेशन महत्त्वाची भूमिका बजावले अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिली. 

सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने झालेल्या वार्तालापमध्ये ते बोलत होते. यावेळी माजी सभापती दैदिप्य वडापूरकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस उमेश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. सहकारमंत्री देशमुख म्हणाले, लोकमंगलच्या माध्यमातून सोलापूरच्या विकासासाठी प्रयत्न झाले आहेत. लोकमंगलमुळे मर्यादा पडत आहेत, लोकमंगलच्या माध्यमातून माझ्यासोबत ठराविकच मंडळी असल्याचा आरोप सातत्याने होतो त्यामुळे सोलापूर सोशल फाउंडेशनचा पर्याय शोधला असल्याचेही त्यांनी सांगितले. सोलापूर शहर व जिल्ह्यातील चाळीस लाख लोकांना सोबत घेऊन हे फाउंडेशन कार्यरत राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

सोलापूर शहर व जिल्ह्यातील धार्मिक पर्यटन, सोलापुरी चादरी, कडक भाकरी व शेंगा चटणी, यासह सोलापूरच्या इतर उत्पादनांना या फाउंडेशनच्या माध्यमातून बाजारपेठ दिली जाणार आहे. सोलापूर फाउंडेशन कोणताही व्यवसाय करणार नसल्याचेही सहकारमंत्री देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले.

राजकीय भाष्य टाळले... 
गेल्या काही दिवसांपासून सोलापूर लोकसभा मतदार संघात राज्यसभा सदस्य अमर साबळे यांचा संपर्क वाढला आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख व सोलापूरचे भाजप खासदार शरद बनसोडे यांच्यातील मतभेद पाहता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी खासदार साबळे यांना सोलापूर मतदार संघातून सहकारमंत्री देशमुखांच्या पुढाकारातून भाजपची उमेदवारी मिळेल असा अंदाज आहे. सोलापुरी ब्रॅन्डींगसाठी आपण प्रयत्न करत असताना आगामी लोकसभा निवडणुकीत सोलापूरमधून भाजपचा उमेदवार सोलापुरी असेल की बाहेरचा असा प्रश्‍न केला असता सहकारमंत्री देशमुख यांनी राजकीय भाष्य टाळत भाजप देईल, त्या उमेदवाराच्या सोबत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Establishment of Solapur Social Foundation For Solapur Branding