आरक्षणाच्या मागणीसाठी वाईत धनगर समाजाचा तहसील कार्यालयावर मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

वाई - धनगर समाजाला, एसटीचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी वाई तालुका धनगर कृती समितीतर्फे आज येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मोर्चाच्यावतीने तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. 

वाई - धनगर समाजाला, एसटीचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी वाई तालुका धनगर कृती समितीतर्फे आज येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मोर्चाच्यावतीने तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. 

सिध्दनाथवाडी येथील अंबाबाई मंदिरात साडे अकरा वाजता आरती करून मोर्चाची सुरुवात झाली. मल्हार क्रांतीचा विजय असो, आरक्षण मिळालंच पाहिजे, आदी विविध घोषणा देत , हातात फलक घेऊन आणि भंडा-यांची उधळण करीत वाई, बावधन, सुरुर या गावांमधील शेकडो समाज बांधव मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा एस.टी.स्टॅड, महाराणा प्रताप चौक, शिवाजी चौक, पोस्ट कार्यालय, पंचायत समिती, बाबधन नाका मार्गे तहसिल कार्यालयावर पोहचला. यावेळी मोर्चाच्यावतीने महसूल नायब तहसिलदार मैमुन्निसा संदे यांना निवदेन देण्यात आले. त्यानंतर प्रवेशव्दारावर झालेल्या सभेत माजी नगराध्यक्ष राजाभाऊ खरात, डी.बी.खरात, राहुल खरात, तानाजी कचरे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणा संदर्भातील वस्तुस्थिती मांडली. आदिवासी मंत्रालयाने उच्च न्यायालयात राज्यात धनगर ऐवजी धनगड समाज असल्याची चुकीची माहिती दिल्याने धनगर समाजाला अनुसुचित जातीचे आरक्षण मिळत नाही. युती सरकार सत्तेवर आल्यावर पंधरा दिवसात धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मात्र चार वर्षे होवून अद्याप आरक्षणासंदर्भातील निर्णय झाला नाही. अशा प्रकारे चुकीची माहिती व खोटी अश्वासने देवून समाजाची दिशाभूल करणा-या शासनाचा निषेध यावेळी करण्यात आला. सातारा जिल्ह्यात व वाई तालुक्यात धनगड जातीची लोकसंख्या किती आहे. आजपर्यंत महसूल खात्याकडून किती लोकांना धनगड जातीचे दाखले देण्यात आले. याबाबतच्या आकडेवारीसह लेखी माहिती द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.     

यावेळी माजी नगराध्यक्ष शंकरराव खरात, माजी नगरसेवक दत्तात्रय खरात, डी.बी.खरात, सुधीर खरात, जयवंत कचरे, वामनराव खरात, श्रीरंग कचरे, राहूल गोंजारी, अनिल ठोंबरे, बिनायक जानकर, बाळकृष्ण बरकडे आदी उपस्थित होते. पोलिस निरीक्षक विनायक वेताळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्रसिंह निंबाळकर, बबन येडगे, उपनिरीक्षक शिरीष शिंदे व त्यांच्या सहकार्यांनी पोलिस बंदोबस्त चोख ठेवला. मोर्चा शांततेत पार पडला.  

Web Title: On the eve of the demand for reservation, a rally on the Tehsil office of Viag Dhangar community