राईनपाडा हत्याकांड : एक वर्षानंतरही डवरी समाज उपेक्षितच!

Crime
Crime

मंगळवेढा : राज्यभर खळबळ उडालेल्या राईनपाडा हत्याकांडात पाचजणांचे बळी गेल्यानंतरही भिक्षेवर जीवन जगणाऱ्या नाथपंथी डवरी समाजाचे समोर आलेले प्रश्न तब्बल एक वर्षानंतरही उपेक्षितच राहिलेले आहेत.

भारत माळवे, भारत भोसले, दादाराव भोसले, अग्नू इंगोले (रा. खवे, ता.मंगळवेढा) राजू भोसले (गोंदवन, कर्नाटक) या पाच जणांचा या हत्याकांडात मृत्यू झाला होता. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे भिक्षा मागण्यासाठी ते गेले होते. तेव्हा तेथील जमावाने मुले पळवणारी टोळी समजून त्यांना मारहाण केली होती. यामध्ये या पाच जणांचा मृत्यू झाला होता. या हत्याकांडानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना शिक्षा झालेली नाही. या हत्याकांडानंतर डवरी समाजाची सरकारने दिरंगाई केली आहे. हत्याकांडातील मृतदेह अंत्यविधीसाठी खवे येथे आणले असता समाजातील लोकांनी अंत्यविधी रोखून धरला होता. या समाजातील लोकांना रेशन कार्ड तत्काळ मिळावे, घरकुलाचा प्रश्न मार्गी लावावा, जातीचे दाखले, मृत नातेवाईकांच्या वारसांना शासकीय नोकरी द्यावी, तसेच त्यांना भिक्षा मागण्यासाठी शासकीय ओळखपत्र द्यावे, अशा मागणीचे पत्र आमदार भारत भालके यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना दिले होते. या मागण्यांची पूर्तता लवकर करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी उपस्थितांसमोर सांगितल्यानंतर मृतांवर अंत्यविधी करण्यात आला होता. 

त्यानंतर नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्यातील 13 आमदारांनी या समाजाचा प्रश्न उचलून धरला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू असून आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशीच उत्तरे देण्यात आली होती. मात्र, या समाजाच्या रखडलेल्या प्रश्नांसंदर्भात अद्यापही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. उपस्थित करण्यात आलेले सर्व प्रश्न अजूनही 'जैसे थे'च आहेत. शासनाने मृतांच्या नातेवाईकांना घरकुल मंजूरीचे पत्र दिले होते, पण यशवंतराव चव्हाण मुक्त घरकुल योजनेच्या या विभागाला निधी नसल्यामुळे या घरकुलाचा प्रश्न देखील प्रलंबित आहे. तसेच मृत नातेवाईकांच्या वारसांना अजूनही नोकरी मिळालेली नाही.

शासनच उदासीन
जमियत-उल्मा-ए-हिंद या संघटनेने मृत नातेवाईकांच्या मुलींच्या विवाहासाठी मदतीचा हातभार लावला होता. स्वयंसेवी संस्थांकडून आर्थिक मदत मिळाली. मात्र, पाच जणांचा बळी जाऊन देखील शासन मात्र या समाजाचे प्रश्न सोडवण्यात उदासीन राहिले आहे.

हत्याकांडात माझ्या वडिलांचा बळी गेल्यावर कुटुंब उघड्यावर आले. गावात कोणताही रोजगार उपलब्ध नसल्याने मी सध्या पुण्यात काम करीत आहे. त्यामुळे शासनाने आमचा विचार करावा.
- सुनील भोसले, मृताचा मुलगा

वर्षानुवर्ष भिक्षेवर जगणाऱ्या नाथपंथी डवरी, गोसावी, जोशी, नंदीबैलवाला या समाजासाठी स्वतंत्र निधी देऊ, असे आश्वासन शासनाने दिले होते. यासंदर्भात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्याकडे या प्रश्नांसंदर्भात मागणी केली होती; परंतु वर्षे उलटून गेले तरी या समाजाचे प्रश्न सोडविण्यात आलेले नाहीत. झुंडशाहीने होणाऱ्या हल्ल्यांपासून संरक्षण मिळणे आवश्यक आहे. पदवी-पदव्युत्तर शिक्षणासाठी या समाजाला शिष्यवृत्ती मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे उच्चशिक्षित होण्याचे स्वप्न भंग पावत आहे.
- मच्छिंद्र भोसले, अध्यक्ष, भटक्या विमुक्त जाती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com