'सगळं काही ठीक होईल'; नानांचा पूरग्रस्तांना भावनिक आधार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

पद्माराजे विद्यालयात सध्या वास्तव्यास असलेल्या काही पूरग्रस्तांची नाना पाटेकर यांनी भेट घेतली. त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि त्यांना धीर देण्याचा नाना यांनी प्रयत्न केला.

कोल्हापूर : महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना पूराचा चांगला फटका बसला असून तेथील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पूरग्रस्तांसाठी मदत पाठविली जात आहे. जो तो आपापल्या परीने मदतकार्यात खारीचा वाटा उचलताना दिसत आहे. 

मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकारदेखील या कार्यात सहभागी झाले आहेत. संवेदनशील कलाकार आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून समाजाप्रती आपली निष्ठा जपणारे अभिनेते नाना पाटेकर यांनी आज कोल्हापूरमधील शिरोळला भेट दिली. काळजी करू नका, सगळं नीट होणार आहे, असे आश्वासन अभिनेते नाना पाटेकर यांनी पूरग्रस्तांना दिले. तसेच शिरोळमध्ये 500 घरे बांधणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. शासनाने काही निधी दिला असून बाकीचे पैसे आम्ही देणार आहोत. मला यासाठी कोणतंही श्रेय नको आहे. जे काही करतोय, ते आपण सगळेजण करत आहोत. प्रत्येकाने आपला वाटा उचलायाचा आहे, आत्ताही अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहेत. खूप चांगल्या पद्धतीने मदतकार्य सुरु आहे, असेही नाना म्हणाले.  

यावेळी पद्माराजे विद्यालयात सध्या वास्तव्यास असलेल्या काही पूरग्रस्तांची नाना पाटेकर यांनी भेट घेतली. त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि त्यांना धीर देण्याचा नाना यांनी प्रयत्न केला. यावेळी त्यांना पाहून अनेकांना आपले अश्रू अनावर झाले. तेव्हा त्यांना धीर देताना रडू नका, सगळं काही ठीक होईल, असा भावनिक आधार नानांनी उपस्थितांना दिला. सरकार त्यांचे काम करत आहे. शेवटी सरकार म्हणजे तीदेखील माणसेच आहेत. त्यामुळे सर्वांनी मदतकार्यात सोबत येऊन कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

शिरोळनंतर कोल्हापूर आणि सांगलीमधील काही गावांना नाना पाटेकर भेट देणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Everything will be fine Emotional support for flood victims from Nana Patekar