सांगली पालिकेत तब्बल ६६ टक्के नागरिकांनी भाजपला नाकारले - जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

सांगली - महापालिका निवडणुकीचा कौल आम्हाला मान्य आहे. मात्र आमचा पराभव बंडखोरांना अनपेक्षितरीत्या मिळालेल्या जास्त मतांमुळे झाला, भाजपमुळे नाही. निवडणुकीतील मतांची टक्केवारी पाहिल्यास तब्बल ६६ टक्के नागरिकांनी भाजपला नाकारले आहे. 

सांगली - महापालिका निवडणुकीचा कौल आम्हाला मान्य आहे. मात्र आमचा पराभव बंडखोरांना अनपेक्षितरीत्या मिळालेल्या जास्त मतांमुळे झाला, भाजपमुळे नाही. निवडणुकीतील मतांची टक्केवारी पाहिल्यास तब्बल ६६ टक्के नागरिकांनी भाजपला नाकारले आहे. 

मात्र या निकालाने जनतेलाही आश्‍चर्याचा धक्का बसलाय. भाजपपेक्षा जास्त मते जनतेने आघाडीला दिली. म्हणजेच आघाडीचा विचार जनतेने स्वीकारला, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी महापालिका निवडणूक निकालावर मत मांडताना पत्रकार परिषदेत केले. ते म्हणाले, ‘‘या निवडणुकीत भाजपला ३४ तर आघाडीला ३७ टक्के मते मिळाली.

आघाडीच्या बंडखोरांना १० टक्के मते मिळाली. त्यामुळे आघाडीचा पराभव हा भाजपमुळे नाही तर बंडखोरांमुळे झाला. राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव कमी मतांनी झाला. तेथे बंडखोरांना अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली. बंडखोरी टाळण्यासाठी चार-चार वेळा बैठका घेतल्या. त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश आले नाही.’’

ते म्हणाले, ‘‘विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमुक्त सांगली हे भाजपचे स्वप्न आहे. पण त्यांना मिळालेली मते पाहिली तर ते पूर्ण होणार नाही. पराभवाने राष्ट्रवादी खचणार नाही. आम्ही जनतेची सेवा करीत राहू. आमचे नगरसेवक विकासाचा आग्रह धरतील. जनतेने शहर भाजपच्या ताब्यात दिलेय. आघाडी चांगल्या कल्पनांच्या पाठीशी राहील. भाजपने जाहीरनाम्यात दिलेली आश्‍वासने अंमलात आणावीत. आमच्या जाहीरनाम्यातील विषय पूर्ण करण्यासाठी आमचे नगरसेवक पाठपुरावा करतील.’’

ईव्हीएमची आठवण त्यांनाच कशी झाली ?
निकालानंतर पराभूत होणारे ईव्हीएमचे नाव घेतात, पैशाचा वापर झाला हे पराभवानंतर ठरलेले वक्तव्य असते, असे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले होते. यावर ‘निकाल लागल्यानंतर ईव्हीएमबाबत आम्ही काहीही बोललो नसताना त्यांनीच कसे काय केले? ईव्हीएम व पैशाबाबत त्यांनाच कशी काय आठवण झाली?’ असा उपरोधिक प्रश्‍न जयंत पाटील यांनी केला. आम्ही तसा आरोप करण्याआधीच लोकांना भेटवस्तूचे वाटप करा, बॅगा भरून सांगलीला मुक्कामाला जाणार, असे कोण म्हणाले? याची आठवणही श्री. पाटील यांनी करून दिली.

भाजपमधील आयात नगरसेवकांनाही सोडू नका
श्री. पाटील म्हणाले, ‘‘महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करावीच. जे त्यात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी. यात भाजपमध्ये आयात केलेले नगरसेवक सापडल्यास त्यांची नावे दाबून ठेवू नका, असे आव्हान दिले. घोटाळे बाहेर काढल्यावर भाजपच अल्पमतात येईल, अशी स्थिती होईल.’’

 

Web Title: Ex Minister Jayant Patil comment on Sangli corporation election result