वंचित, मनसेसह महाआघाडीद्वारे युतीला अद्दल घडवू - राजू शेट्टी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जुलै 2019

सांगली - आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह एकत्रित लढल्यास भारतीय जनता पक्ष-शिवसेनेला अद्दल घडवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज येथे दिला.

सांगली - आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह एकत्रित लढल्यास भारतीय जनता पक्ष-शिवसेनेला अद्दल घडवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज येथे दिला.

विधानसभा निवडणुकीसाठी 1 ऑगस्टपर्यंत महाआघाडीची वाट पाहू; अन्यथा स्वबळावर "स्वाभिमानी' मैदानात उतरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ""लोकसभा निवडणुका या भावनेच्या मुद्द्यावर लढल्या गेल्या. राष्ट्रवाद, धर्मवाद हे मुद्दे लोकांना महत्त्वाचे वाटले. आता निवडणूक झाल्यावर लोकांना कळलं की देशात बेरोजगारी वाढली आहे. राज ठाकरे सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील आहेत. त्यामुळे मनसे, "वंचित'सहित विरोधकांनी सरकारच्या विरोधात रान पेटवावं, यासाठी त्यांची भेट घेतली. ईव्हीएमबद्दल अनेकांच्या मनात शंका आहे. हा भाजपचा विजय नसून, ईव्हीएमचा विजय आहे, असं सध्या बोललं जात आहे. लोकांचा अविश्‍वास लोकशाहीसाठी घातक आहे आणि यावर निवडणूक आयोग मूग गिळून गप्प आहे. ते जे ठरवतात तेच होत असेल तर हे रसायन वेगळंच आहे. ते जेवढ्या जागा म्हणतील तेवढ्याच जागा जिंकून येतात.'' 

ते म्हणाले, ""विधानसभा निवडणुकीसाठी काही महिन्यांचा अवधी आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी, मनसेसह सर्व राजकीय पक्षांनी भाजप-शिवसेनेला शह देण्यासाठी एकत्र आले पाहिजे. हे राजकीय पक्षांना आव्हान असेल. त्यासाठी 1 ऑगस्टपर्यंत महाआघाडीसाठी आम्ही "अल्टिमेटम' देत आहोत. एकत्र लढण्याचा निर्णय झाल्यास जागा कमी-जास्त लढविण्याची "स्वाभिमानी'ची तयारी आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला शह देण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी मनसेसह सर्व राजकीय पक्षांनी सरकारविरोधात मोट बांधली पाहिजे. महाआघाडी न झाल्यास "स्वाभिमानी'चे 49 उमेदवार तयार आहेत. लोकसभा निवडणुकीत "वंचित'मुळे नुकसान झाले. अजूनही वेळ गेलेली नाही, त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी महाआघाडीत सामील व्हावे.'' 

महसूलमंत्र्यांना टोला 
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून भाजप-शिवसेनेला विधानसभेला 246 जागा मिळतील, असा दावा केला जात आहे. ज्योतिषाचा अंदाज चुकेल; पण दादांचा अंदाज चुकत नाही. ते ज्योतिषालाही मागे टाकतील, असा त्यांचा अंदाज असतो. एवढे ईव्हीएम मशिन परफेक्‍ट काम करीत असल्याचा टोला श्री. शेट्टी यांनी लगावला. यापुढील काळात जनतेतूनच त्यांच्याविरोधात उठाव झाल्याचे दिसून येईल, असेही ते म्हणाले. 

हमीभावासाठी जनजागृती 
श्री. शेट्टी म्हणाले, ""केंद्र सरकारने पीक खर्चाच्या दीडपट हमीभावाचे आश्‍वासन दिले. ते आजही पाळले जात नाही. सध्या वजा दर मिळतोय. त्याविरोधात आम्ही शेतकऱ्यांमध्ये जनजागृती सुरू करीत आहोत. वजा भाव मिळणारी पिके अशी  भात- 618, ज्वारी- 936, बाजरी- 184, मका- 595, नाचणी- 898, तूर- 2325, मूग- 2498, उडीद- 2490, भुईमूग- 1423, सूर्यफुल- 1728, कपाशी- 1762 रुपये. आदी पिकांची किंमत सरकारने ठरवली आहे.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ex MP Raju Shetti comment