'कडकनाथ' घोटाळ्यातील संस्था 'या' मत्र्यांशी संबंधित 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात कडकनाथ कोंबडी पालन करण्याच्या अमिषाने कोट्यावधी रूपयांची फसवणूक केलेली संस्था ही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला. 

कोल्हापूर - सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात कडकनाथ कोंबडी पालन करण्याच्या अमिषाने कोट्यावधी रूपयांची फसवणूक केलेली संस्था ही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला. 

दरम्यान, पूरग्रस्तांचे वेळेत पुनर्वसन व त्यांना तातडीची मदत मिळावी या मागणीसाठी उद्या (ता. 28) संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहितीही श्री. शेट्टी यांनी यावेळी दिली. 

कडकनाथ घोटाळा प्रकरणी श्री. शेट्टी म्हणाले,"ज्या सांगलीतील कंपनीने ही फसवणूक केली आहे, त्याचा मालक हा राज्यमंत्री खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचा युवा आघाडीचा अध्यक्ष आहे. कंपनीचे नावही रयत या नावावरूनच दिले आहे. अलिकडेच संबंधित कंपनीच्या मोहिते नावाच्या मालकाचा विवाह श्री. खोत यांच्या पुतणीशी झाला आहे. श्री. खोत यांनीही यावर अजून तरी खुलासा केलेला नाही किंवा ते हे टाळूही शकत नाहीत. यावरून ही कंपनी श्री. खोत यांच्याशी संबंधित आहे. कृषी विभागाकडून या व्यवसायावर 50 टक्के अनुदान मिळवून देण्याच्या अमिषाने ही फसवणूक झाली आहे. त्यामुळे या कंपनीला राजकीय आश्रय आहे. अशा फसवणाऱ्या कंपन्यांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत यासाठी दोन दिवसांत पोलीस अधीक्षकांचीही भेट घेणार आहे.' 

पूरग्रस्तांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी उद्या आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. निवडणुका केव्हाही जाहीर होण्याची शक्‍यता आहे. एकदा निवडणूक लागली की, पूरग्रस्तांचे पुनर्वसन व मदत कार्य ठप्प होणार आहे. तत्पुर्वी तातडीने या लोकांचे प्रश्‍न मार्गी लागावेत, असे आम्ही मोर्चाच्यावतीने सरकारला सांगणार आहे. कारण या पुरात सर्वसामान्य माणूस, शेतकरी, कष्टकरी, उद्योजक, व्यापारी उद्‌वस्त झाला आहे, त्याला उभे करण्याची गरज आहे. त्यांच्याशी संबंधित काय निर्णय असेल तो तातडीने घ्यावा, हे आम्ही मोर्चाने सरकारला सांगू, असे श्री. शेट्टी यावेळी म्हणाले. 

महापुरामुळे चर्चा थांबली 
विधानसभेला आघाडी कोणाशी करायची याची चर्चा महापुरामुळे थांबली आहे, असे सांगून श्री. शेट्टी म्हणाले,"राज्य बॅंकेतील गैरव्यवहार प्रकरणी सरकारने नेहमीच बोटचेपी भुमिका घेतली. ज्यांच्यावर हे आरोप आहेत, त्यापैकी अनेक जण आज भाजपा किंवा शिवसेनेते गेले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल झालेल्या या गुन्ह्याच तपास पोलिसांनी निप्क्षपातीपणे करून "दूध का दूध, पाणी का पाणी' करावे.' 

कोंबड्या महाजनादेश यात्रेत गेल्या काय ?
सोन्याची अंडी देणारी कोंबडी ऐकून होतो, पण 70 रूपयांला एक अंडे हे मी पहिल्यांदाच ऐकतो. पण हे अंडे देणाऱ्या कोंबड्या गेल्या कुठे ? का त्या सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत सहभागी झाल्या, हे पहावे लागेल, असा टोलाही श्री. शेट्टी यांनी यावेळी लगावला. 
............ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ex MP Raju Shetti comment on Kadaknath Fraud