मिरज हायस्कूलसाठी देश- विदेशातील माजी विद्यार्थी लढाणार

प्रमोद जेरे
Saturday, 26 September 2020

हरातील मोठी शिक्षण परंपरा असलेले मिरज हायस्कूल वाचवण्यासाठी आता माजी विद्यार्थ्यांनी आपली वज्रमूठ आवळली आहे.

मिरज (जि. सांगली) : शहरातील मोठी शिक्षण परंपरा असलेले मिरज हायस्कूल वाचवण्यासाठी आता माजी विद्यार्थ्यांनी आपली वज्रमूठ आवळली आहे. देश - विदेशातील शेकडो विद्यार्थी यासाठी एकत्र आले आहेत. यापैकी अनेक परदेशस्थ माजी विद्यार्थ्यांनी मिरजेला येऊन लढ्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा करण्याबाबतही प्रतिसाद दिला आहे.

यासाठीची कायदेशीर लढाई लढण्यासाठीही महापालिके विरूध्द थेट मैदानात उतरण्याची ही तयारी काही माजी विद्यार्थ्यांनी दर्शवली आहे. 
कृती समितीमधील आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून आपल्या सहभागाची नोंद घ्या असेही हे सर्व विद्यार्थी समितीमधील कार्यकर्त्यांना सांगत आहेत. दरम्यान मिरज हायस्कूलच्या कृती समितीने माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारास सकारात्मक प्रतिसाद देऊन या लढ्याची ताकद वाढवण्याचे ठरवले आहे.

सध्या हे हायस्कूल वाचवण्यासाठी स्थापन झालेल्या मिरज हायस्कूल बचाव कृती समितीने आता हायस्कूल विकण्यास निघालेल्या कारभाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी सर्व प्रकारची तयारी सुरू केली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात प्रशासकीय स्तरावर सर्व अधिकाऱ्यांना याबाबत विनंती करण्यात येणार आहे. त्यानंतर राजकीय आणि सामाजिक स्तरावर यासाठीचा संघर्ष तीव्र करण्याची ही बचाव कृती समितीची तयारी आहे. समितीमधील सर्व सदस्य सातत्याने याबाबत चर्चा करत आहेत. यासाठी काही शिस्तीच्या मर्यादाही समितीने सदस्यांना घालून दिल्याने हा लढा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.यामधील माजी विद्यार्थ्यांचाही सहभाग तितकाच मोलाचा ठरणार आहे.

कायदेशीर लढाईसाठी वेगळी टीम 
मिरज हायस्कूल वाचवण्यासाठी मिरज हायस्कूल बचाव कृती समिती मधील अनेक सदस्य सध्या कायदेशीर लढाईचे जोरदार तयारी करीत आहेत बचाव कृती समितीची ही एक प्रकारची स्वतंत्र कायदेशीर टीमच तयार झाली आहे ज्यामुळे महापालिकेतील हायस्कूलची जागा विकण्यास निघालेल्या कारभार यांचे धाबे दणाणले आहे 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ex-students from state and abroad will fight for Miraj High School