SUNDAY SPECIAL : अरे वा...! तब्बल 432 सावित्रीच्या लेकींना "बचतपत्राचा' आधार 

विजयकुमार सोनवणे
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

शासकीय उपक्रमापासून प्रेरणा 
शासनाकडून जे उपक्रम राबविले जात आहेत, त्यापासून मला प्रेरणा मिळाली. माझा वाटा खारीचा असला तरी पालकांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मुदतीनंतर मिळणारी रक्कम ही त्या मुलीसाठी लाख मोलाची असणार आहे. 
- प्रवीण डोंगरे, माजी उपमहापौर , सोलापूर 

सोलापूर ः प्रभागात जन्मलेल्या मुलीच्या नावाने एक हजार रुपयांचे दहावर्षीय राष्ट्रीय बचत पत्र ठेवण्याचा उपक्रम माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे गेल्या सहा वर्षांपासून राबवित आहेत. आतापर्यंत त्यांनी तब्बल 432 मुलींच्या नावे स्वखर्चाने राष्ट्रीय बचतपत्र काढले आहे. नगरविकास विभागाच्या मुख्य सचिव मंजुषा म्हैसकर यांच्या हस्तेही या बचतपत्रांचे वाटप झाले आहे. 

हेही वाचा आणि पहा... पण इतक्‍या सकाळी येचाल असे वाटलेच नव्हते...! 

उपक्रमामध्ये ठेवले सातत्य 
स्त्री भ्रूणहत्येचे वाढते प्रमाण, मुलींवर होत असलेल्या अत्याचार या पार्श्‍वभूमीवर पालकांची मुलींसंदर्भातील मानसिकता बदलत चालली आहे. या पार्श्‍वभूमीवर स्त्री-जन्माचे स्वागतच बचत पत्राने करायचे, असा निर्णय श्री. डोंगरे यांनी घेतला व त्यानुसार कार्यवाहीसुद्धा केली. 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत ते पराभूत झाले, मात्र त्यांनी आपला उपक्रम आजही सुरु ठेवला आहे. प्रत्येक वर्षी दीडशे मुलींचा जन्म अपेक्षित धरून त्यासाठी पाच लाख रुपयांची तजवीज श्री. डोंगरे यांनी करून ठेवली आहे. 

हे वाचायलाच हवं.... महाराष्ट्राच्या "पवार' फुल्ल राजकारणावर सोनाली कुलकर्णींच ट्‌विट 

मुलीच्या शिक्षणाची सोय व्हाही हा हेतू 
श्री. डोंगरे यांच्या प्रभागात मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आहे. त्यामध्येही विडी कामगारांची संख्या मोठी आहे. रोजच्या उत्पन्नावरच त्यांचे घर चालते. त्यातच घरात मुलगी जन्माला आली तर तिचे पालनपोषण करणे या कुटुंबांना जमत नाही. मुलींच्या शिक्षणाचा खर्च कोण करणार, या हेतूने हे पालक मुलींना विडी करण्याकडेच वळवितात. त्यामुळे इच्छा असूनही अनेक मुलींना शिक्षण घेता येत नाही. मुलगी शाळेत जाण्यासाठी तयार होईल, त्या वेळी ही रक्कम तिच्या मदतीला येणार आहे. 

मुंबईत फिरायचे आहे? मग हे वाचाच.... रेल्वेच्या तीन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक 

पालकांचा असाही प्रतिसाद 
डोंगरे यांच्या उपक्रमाला पालकांनीही उत्तम प्रतिसाद दिला आहे. श्री. डोंगरे हे एक हजार रुपयांचे प्रमाणपत्र देणार आहेत, त्यामध्ये स्वतःची काही रक्कम घालून पाच ते 25 हजार रुपयांचे प्रमाणपत्र मुलीच्या नावाने ठेवले आहेत. 15 ऑगस्ट 2013 रोजी जन्मलेल्या मुलीच्या नावाने संबंधित पालकाने 50 हजार रुपये ठेवले असून, श्री. डोंगरे यांच्या प्रमाणपत्राची रक्कम धरून ती 51 हजार रुपयांवर गेली आहे. सकारात्मक भूमिकेचे हे यश असल्याचे ते मानतात. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Exactly 432 students help national saving certificate