यंदा मेमधील शेवटच्या आठवड्यात परीक्षा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

कोल्हापूर - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा यंदा मेमधील शेवटच्या आठवड्यात होणार आहेत. 23 मे ते 10 जून या काळात विभागातील 95 केंद्रांवर परीक्षांचे नियोजन होणार असून पन्नास हजारांवर विद्यार्थी या परीक्षा देणार आहेत. दरम्यान, यापूर्वी मेच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा व्हायच्या. मात्र, यंदाची प्रवेश प्रक्रियाच उशिरा सुरू झाल्याने परीक्षाही पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. ऑक्‍टोबरमध्ये रिपीटर विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या परीक्षाही यंदा जानेवारीमध्ये घ्याव्या लागल्या. 

अर्धवट शिक्षण राहिलेल्या विद्यार्थ्यांना आपली नोकरी, व्यवसाय किंवा शेती-उद्योग सांभाळून पुढील शिक्षण पूर्ण करता यावे, या उद्देशाने मुक्त विद्यापीठातर्फे विविध अभ्यासक्रम चालवले जातात. कोल्हापूर विभागात कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांचा समावेश असून एकूण दोनशे चोवीस अभ्यासकेंद्रे आहेत. येथे एकूण एकशे दोन विविध अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसह विविध कृषी अभ्यासक्रमांचा समावेशही त्यामध्ये आहे. कृषीविषयक अभ्यासक्रम चालवल्या जाणाऱ्या अभ्यासकेंद्रांची संख्या आठ असून तेथे सध्या परीक्षांना प्रारंभ झाला आहे. सध्या प्रात्यक्षिक परीक्षा येथे सुरू असून वीस एप्रिलपासून लेखी परीक्षांना प्रारंभ होईल. मात्र, उर्वरित दोनशे सोळा अभ्यासकेंद्रांवर विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असून त्यांच्या परीक्षा 23 मेपासून सुरू होतील. पदवी अभ्यासक्रम चालवणाऱ्या केंद्रांची संख्याच त्यापैकी सर्वाधिक एकशे चोवीस इतकी आहे. याबाबत अधिक माहिती देताना कोल्हापूर विभागाचे संचालक डॉ. दादासाहेब मोरे सांगतात, ""यूजीसीकडून काही अभ्यासक्रमांना परवानगी मिळण्यासाठी यंदा उशीर झाला. त्यामुळे एकूणच प्रवेश प्रक्रिया तीन ते चार महिने पुढे सुरू राहिली. त्यामुळे विविध अभ्यासक्रमांच्या अध्यापनासह विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी आवश्‍यक वेळ देणे अधिक महत्त्वाचे होते. त्यामुळे यंदा पंधरा दिवस उशिरा परीक्षा सुरू होणार आहेत.'' 

दृष्टिक्षेपात परीक्षा... 
- 23 मेपासून परीक्षांना प्रारंभ 
- 10 जूनपर्यंत विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे नियोजन 
- पन्नास हजारांवर विद्यार्थी परीक्षा देणार 
- 224 अभ्यासकेंद्रांपैकी 95 केंद्रांवर परीक्षा होणार 
- कृषी अभ्यासक्रमांच्या आठ केंद्रांवर वीस एप्रिलपासून परीक्षा 

Web Title: Examination of last may week